बीडजवळ नादुरुस्त ट्रकवर पाठीमागून दुसरा ट्रक धडकला; पंक्चर काढणारा चालक ठार
By संजय तिपाले | Published: August 20, 2022 12:22 PM2022-08-20T12:22:30+5:302022-08-20T12:26:49+5:30
सोलापूर - धुळे महामार्गावर बीडजवळ कांद्याच्या ट्रकवर आदळला फरशीचा ट्रक
बीड : धुळे - सोलापूर महामार्गावरील बाह्य वळणावर पंक्चर काढण्यास थांबलेल्या ट्रकवर पाठीमागून आलेला ट्रक आदळला. यात पंक्चर काढत असलेला चालक जागीच ठार झाला, तर क्लीनर जखमी आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता घडली.
अमजद नजीर शेख (३६, रा. मरियाल गुडा, जि. नलगोंडा, तेलंगणा) असे मयताचे नाव आहे. अजहर जहिरोद्दिन मोहम्मद (२४, रा. मरियाल गुडा, जि. नलगोंडा, तेलंगणा) हा जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे दोघे नेवासा (जि. अहमदनगर) येथून ट्रकमधून (एपी २९ टीबी १४७९) कांदा घेऊन कौवाल, आंध्रप्रदेश येथे जात होते. त्यांचा ट्रक १९ रोजी पहाटे तीन वाजता धुळे - सोलापूर महामार्गावरील बाह्यवळणावरील इमामपूर फाट्यावर आला तेव्हा मागील चाक पंक्चर झाले.
त्यामुळे चालक अमजद शेख व क्लिनर अजहर मोहम्मद हे पंक्चर काढत होते. यावेळी पाठीमागून आलेला फरशी वाहतूक करणारा ट्रक (जीजे २५ यू ५५४५) त्यावर आदळला. यात अमजद शेख जागीच ठार झाले, तर अजहर मोहम्मद गंभीर जखमी आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने पोबारा केला.
बीड ग्रामीण ठाण्याचे पो. नि. संतोष साबळे, सहायक निरीक्षक याेगेश उबाळे, हवालदार पी. टी. चव्हाण, आनंद मस्के, खय्यूम खान, पो. ना. किशोर राऊत, अंमलदार रवी सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले. क्रेनद्वारे वाहने हटविण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील रहदारीला झालेला अडथळा दूर झाला.