एकच पेन्शन, जुनी पेन्शनचा नारा देत कर्मचाऱ्यांनी काढली बाइक रॅली
By अनिल भंडारी | Published: September 21, 2022 01:14 PM2022-09-21T13:14:16+5:302022-09-21T13:14:46+5:30
जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, अधिकाऱ्यांनी हाती फलक घेत दुचाकीवर स्वार होत रॅली काढली.
बीड : एकच पेन्शन, जुनी पेन्शन असा नारा देत बुधवारी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या व समन्वय समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर बाईक रॅली काढण्यात आली. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून, जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, अधिकाऱ्यांनी हाती फलक घेत दुचाकीवर स्वार होत रॅली काढली. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर समन्वय समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषद, कर्मचारी महासंघ, जुनी पेन्शन हक्क संघटना, ग्रामसेवक युनियन, कृषी सहायक संघटना, महसूल कर्मचारी संघटना, राज्य तलाठी संघ, कोषागार कर्मचारी संघटना, आयटीआय निदेशक संघटना, सहकार संघटना व इतर संलग्न संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.