ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला पाठिंबा देत अख्खे गाव बसले उपोषणाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 11:55 AM2024-06-20T11:55:07+5:302024-06-20T11:55:31+5:30
सर्व ग्रामस्थांनी देखील बेमुदत उपोषणाला सुरुवात करत ओबीसी नेते हाके यांना पाठिंबा दिला.
- नितीन कांबळे
कडा (बीड): ओबीस आरक्षण वाचवण्यासाठी वडीगोद्री येथे बेमुदत उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या पाठिंब्यासाठी बीड जिल्ह्यातील एक अख्खे गाव उपोषणाला बसले आहे. खिळद गावाच्या संपूर्ण ग्रामस्थांनी आज गुरुवारी, सकाळी ओबीसी आरक्षण बचावच्या घोषणा देत गावातून फेरी काढत बेमुदत उपोषण सुरू केले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ देखील बेमुदत उपोषणात सामील झाला आहेत.
जालना येथील वडीगोद्री गावात मागील आठ दिवसापासून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहादेव गर्जे व अंकुश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आष्टी तालुक्यातील खिळद ग्रामस्थ एकत्र आले आहेत. ग्रामस्थांनी आज सकाळी गावातून फेरी काढत ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाबाबत प्रबोधन केले. तसेच एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसी एकजुटीचा विजय असो,अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे साहेब अमर रहे, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी देखील बेमुदत उपोषणाला सुरुवात करत ओबीसी नेते हाके यांना पाठिंबा दिला. विशेष म्हणजे, पंचक्रोशीतील ग्रामस्थ देखील गावात दाखल झाले असून त्यांनी देखील उपोषणात सहभाग घेतला आहे.
ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला पाठिंबा देत बीड जिल्ह्यातील अख्खे खिळद गाव बसले उपोषणाला! #obcreservationpic.twitter.com/ZYvCgpnoAH
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) June 20, 2024
अन्यथा महिलाही ओबीसी लढ्यात उतरणार
ओबीसी बचाव आंदोलन सुरू झाले असून अद्यापही सरकारकडून कसलीही दखल घेतली जात नाही. आमच्या हक्काचे आरक्षण सहीसलामत ठेवावे. अन्यथा आम्ही महिला देखील आता या लढ्यात उतारू असा इशारा शालन गर्जे यांनी दिला आहे.
उपोषणस्थळी दररोज होणार किर्तनसेवा
खिळदसह परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन गुरूवारी सकाळपासून ओबीसी बचाव आंदोलनाला पाठिंबा म्हणून उपोषण सुरू केले आहे. या उपोषणस्थळी दररोज किर्तनरूपी सेवा होणार आहे.