असे काय झाले की तिरंगा हातात घेऊन आंदोलक माजी सैनिक चढला झाडावर ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 06:03 PM2022-03-05T18:03:16+5:302022-03-05T18:05:33+5:30
प्रशासनाच्या आश्वासनानंतर माजी सैनिक झाडावरून खाली उतरले.
बीड: आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ एका माजी सैनिकाने शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या झाडावर तिरंगा हातात घेऊन आंदोलन सुरू केले. यामुळे अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. त्यांची समजूत काढल्यानंतर ते झाडावरून खाली उतरल्याने सर्वांनीच मोकळा श्वास घेतला.
मोची पिंपळगाव येथील नदी पात्रातून सुरू असलेले गौण खनिज उत्खनन त्वरित बंद करावे, नदीची लांबी-रुंदी मोजून किती ब्रास उपसा झाला आहे त्याचे मोजमाप करून दंड आकारुन दोषींवर कारवाई करावी यासह अन्य मागण्यासांठी बीड येथील माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. चार दिवसापासून उपोषण सुरू आहे, मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा राग मनात धरुन वाघमारे हे तिरंगा हातात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जुन्या इमारती लगत असलेल्या झाडावर चढले.
ही माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले. तात्काळ आंदोलनस्थळी अग्निशमनच्या जवानांना बोलवण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्याने ते झाडावरून खाली उतरल्याने सर्वांना दिलासा मिळाला.
आता हेही झाड तोडणार का ?
बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर एक महिला आंदोलक चढली हाेती. त्यानंतर ते झाडच तोडण्यात आले होते. आता मुख्य कार्यालयातील झाडावर माजी सैनिक चढले असल्यामुळे आत हेही झाड तोडणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.