रस्त्यासाठी मुलाबाळांसह शेतकरी उसाच्या फडातच बसला उपोषणाला; बीडच्या शेतकऱ्याची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 10:40 AM2022-05-25T10:40:39+5:302022-05-25T10:40:48+5:30
रस्त्याअभावी पाच एकर ऊस जाईना : बीडच्या शेतकऱ्याची व्यथा
माजलगाव (जि. बीड) : तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील शेतकऱ्याच्या शेताला रस्ता नसल्याने त्याचा पाच एकर ऊस शेतातच उभा आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्याने तहसील प्रशासनाच्या विरोधात स्वतःच्या शेतातच आपल्या मुलाबाळांसह उपोषण सुरू केले आहे.
पुरुषोत्तमपुरी शिवारातील जुना सर्वे क्रमांक १९, गट क्रमांक २० मध्ये संतोष बाबासाहेब सोळंके यांची जमीन आहे. त्यात पाच एकर उसाची लागवड केलेली आहे. ऊस पीक हे १८ महिन्याचे झाले असून, अद्याप रस्त्याअभावी कारखान्यास गाळपासाठी गेलेला नाही. मागील पंधरा महिन्यापासून रस्ता मिळण्यासाठी प्रकरण प्रलंबित आहे. परंतु आतापर्यंत त्या प्रकरणात निर्णय देण्यात आलेला नाही. त्यामुळे केवळ रस्त्याअभावी ऊस न गेल्याने या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
ऊस गाळप करण्यासाठी तत्काळ व कायमस्वरूपी रस्ता जुना सर्वे क्रमांक १० व १४ च्या सर्व्हे बांधावरून देण्यात यावा, अशी मागणी १७ मे २०२२ रोजी येथील तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली होती. मात्र निवेदनाची दखल न घेतल्याने संतोष सोळंके यांनी सोमवारपासून पत्नी व दोन मुलांसह उपोषण सुरू केले आहे. या अगोदरही याच शेतकऱ्याने २२ एप्रिल २०२२ रोजी उपोषण केलेले आहे. परंतु अजूनही त्यास न्याय मिळालेला नाही.