वडील म्हणाले, यायला उशीर का झाला, एकुलत्या एक मुलाने घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 11:30 AM2022-06-07T11:30:38+5:302022-06-07T11:32:15+5:30
तरुणास दोन विवाहित बहिणी आहेत. त्याच्यासाठी वधूशोध सुरू होता.
बीड : घरी यायला उशीर का झाला, अशी विचारणा केल्याने दारूच्या नशेत असलेल्या एकुलत्या एक मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ६ जून रोजी तालुक्यातील उमरद खालसा येथे उघडकीस आली. पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रकांत भारत जाधव (२५, रा. उमरद खालसा, ता. बीड) असे मयताचे नाव आहे.
तो बीडमध्ये शिवणकाम करायचा. ४ जून रोजी रात्री साडेदहा वाजता तो घरी पोहोचला. त्यामुळे वडील भारत जाधव यांनी त्यास टोकले. इतका उशीर का झाला, अशी विचारणा त्यांनी केली. तो नशेत असल्याने आईनेही त्यास समज देण्याचा प्रयत्न केला. शिवाय लवकर जेवायला ये, असे सांगितले. मोबाइल चार्जिंगला लावून येतो, असे सांगून आतील खोलीत गेल्यावर चंद्रकांत जाधव याने लोखंडी हूकला दोरीने गळफास घेतला. ही बाब निदर्शनास येताच आई-वडिलांनी त्यास फासावरून खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान ६ जून रोजी सकाळी साडेसहा वाजता त्याचा मृत्यू झाला. भारत जाधव यांच्या जबाबावरून जिल्हा रुग्णालय चौकीत नोंद झाली. पो. ना. सखाराम माने यांनी पंचनामा केल्यावर उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला.
लग्नासाठी सुरू होता वधूशोध
दरम्यान, चंद्रकांत जाधव यास दोन विवाहित बहिणी आहेत. त्याच्यासाठी वधूशोध सुरू होता. काही स्थळेही आली होती. मात्र, त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. एकुलत्या एक मुलाने आपली जीवनयात्रा संपविल्याने कुटुंबाचा आधार हरवला आहे.