अश्वस्वार होऊन शाळेत ठेवले पहिले पाऊल;मिरवणूक काढत वाजतगाजत मुलाचा केला शाळा प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 07:20 PM2022-06-14T19:20:38+5:302022-06-14T19:21:47+5:30
शहरातील बुद्ध विहार ते गांधी चौक, व्यापारपेठ आणि जि.प. शाळेपर्यंत मुलगा सारीपूत्त याची बँड लावून घोड्यावरून मिरवणूक काढली.
शिरूर कासार (बीड) : तालुक्यातील उखळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दादा सोनवणे यांनी आपल्या मुलाचा शहरातील जि.प. शाळेत वाजतगाजत घोड्यावरून मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात प्रवेश केला आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्येदेखील गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असून पालकांचा ओढा या शाळांकडे असावा अशा उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबविला.
शहरातील बुद्ध विहार ते गांधी चौक, व्यापारपेठ आणि जि.प. शाळेपर्यंत सोनवणे यांनी आपला मुलगा सारीपूत्त याची बँड लावून घोड्यावरून मिरवणूक काढली. मिरवणूक मार्गावरील सर्व लोक मोठ्या कुतूहलाने हे आगळंवेगळं चित्र पाहत होते. एरवी आपण नवरदेवाचा परण्या किंवा एखाद्या संत-महंताची घोड्यावरून मिरवणूक पाहत असतो. परंतु एका शिक्षकाने मात्र मराठी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलाचा उत्साहात आणि थाटात प्रवेश व्हायला हवा हा विचार करून सर्व खर्च केला. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापक अंकुश शिंदे यांनी सारीपूत्तचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या वेळी शाळेचे सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जि.प. शाळेत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण
माझे शिक्षणदेखील याच शाळेत झाले असून आज मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या तुलनेत मराठी शाळेत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. पालकांनी जि.प. शाळेविषयी मनात कसलाही न्यूनगंड न बाळगता शाळेत प्रवेश द्यायला हवा, असे शिक्षक तथा पालक दादा सोनवणे म्हणाले.