गावठी पिस्टल बाळगणाऱ्या चाैघांना बेड्या, दोन जिवंत काडतूसही जप्त
By सोमनाथ खताळ | Published: April 22, 2023 04:07 PM2023-04-22T16:07:24+5:302023-04-22T16:23:47+5:30
ही कारवाई बीड शहरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
बीड : विनापरवानगी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दोन पिस्टलसह दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत. ही कारवाई बीड शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी आतिष देशमुख यांच्या फिर्यादीवरून अक्षय व्यंकटराव लाड (वय २३, रा.विद्यानगर पूर्व, बीड), विजय निवृत्ती सुतार (वय २४, रा.गेवराई, ह.मु. शाहूनगर, बीड), कार्तिक संतोष वाघमारे (१९, रा.सुभाष कॉलनी, पेठ बीड) आणि वैभव रामेश्वर पवार (वय २१, रा.रविवार पेठ, बीड) यांच्याविरोधात पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई माजलगावचे सहायक पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोलिस अंमलदार अतीश देशमुख, गणेश नवले, तुकाराम कानतोडे, संतराम थापडे, युवराज चव्हाण, चव्हाण, सारणीकर, आगलावे आदींनी केली.
परळीतही झाली होती कारवाई
दोन दिवसांपूर्वीच परळी पोलिसांनीही सोमेश्वर ज्ञानोबा शहाणे (वय २४ रा.कीर्तिनगर, परळी) याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतूस जप्त केले होते. अशाच प्रकारे जिल्ह्यात इतर ठिकाणीही विनापरवानगी शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाया केल्या जात आहेत; परंतु हे पिस्टल जिल्ह्यात येतातच कसे, हा प्रश्न आहे. पोलिसांनी केवळ कारवाया करून उपयोग नाही, तर ते येऊच नयेत यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.