'नीट' परीक्षा उत्तीर्ण मुलीला मेडिकल प्रवेशाचे आमिष दाखवून १४ लाख रुपये हडपले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 01:38 PM2022-05-21T13:38:05+5:302022-05-21T13:38:48+5:30
महाविद्यालयात प्रवेशही मिळवून दिला नाही आणि रक्कम परत करण्यासही नकार दिला
बीड : ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तुमच्या मुलीला आम्ही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देऊ, असे आमिष दाखवून दोन भामट्यांनी तिच्या पालकांकडून १४ लाख रुपये उकळले. मात्र, नंतर महाविद्यालयात प्रवेशही मिळवून दिला नाही आणि रक्कम परत करण्यासही नकार दिल्याच्या आरोपावरून त्या दोन भामट्यांवर परळीत गुन्हा नोंदवण्यात आला.
मनीषा नंदकुमार फड (रा. माधवबाग, परळी) यांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांची मुलगी गतवर्षी नीट परीक्षा उत्तीर्ण झाली. तिच्या वैद्यकीय प्रवेशासाठी कुटुंबीय प्रयत्नात होते. त्या दरम्यान मनीषा यांचे दीर सुनील श्रीरंग फड यांना युवराज सिंग ऊर्फ सोनू कुमार आणि नितांत गायकवाड (रा. पुणे) या दोघांनी कॉल केला. तुमच्या मुलीला आम्ही पुद्दुचेरी येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, त्यासाठी पाच वर्षांच्या खर्चासह ७५ लाख रुपये लागतील असे त्यांनी सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फड यांनी मागणीनुसार एकूण १४ लाख रुपये त्यांना ८ फेब्रुवारी रोजी पाठविले.
त्यानंतर २२ मार्च रोजी आणखी ५ लाख रुपये त्या दोघांच्या पुण्यातील ऑफिसमध्ये नेऊन दिले. नंतर त्यांनी फड कुटुंबीयांना पुद्दुचेरी येथे बोलावून घेतले. मात्र, तिथे गेल्यानंतर युवराज सिंग याने या कॉलेजचे प्रवेश बंद झाले आहेत, असे सांगून इतर कॉलेजमध्ये प्रवेश देतो अशी बतावणी केली. त्यावेळी फड यांनी पैसे परत मागितले. त्यानंतर युवराज सिंगने पाच लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित १४ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. अखेर हताश झालेल्या मनीषा फड यांनी पोलिसांत तक्रार दिली.