शासनाकडे पैसे नाहीत, मी पदरमोड करून खड्डे बुजवतो; अधिकाऱ्याने हात झटकले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 05:51 PM2022-09-20T17:51:16+5:302022-09-20T17:51:41+5:30
आम्ही भिकमागो आदोलन करून तुमचे पैसे देतो साहेब...
- नितीन कांबळे
कडा (बीड): साबलखेड ते चिंचपुर हा रस्ता दोन वर्षांपासून खराब झाला असुन ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने दुरुस्तीसाठी शासनाकडे पैसे नाहीत, मी पदरमोड करून खड्डे बुजवतोय असे म्हणत हात झटकले. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी भिकमांगो आदोलन करून अधिकाऱ्यांना पैसे देणार असल्याची भूमिका घेतल्याने काहीकाळ तणाव होता.
बीड-नगर राष्ट्रीय महामार्गाचे साबलखेड ते चिंचपूरपर्यंत अर्धवट काम आहे. यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. दुरुस्तीसाठी अनेक वेळा रस्तारोको अंदोलन, उपोषण करण्यात आले, वेळोवेळी पाठपुरावा करून देखील संबंधित विभाग याची दखल घेत नाही. दरम्यान, आज कडा येथे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता आले असता त्यांना नागरिकांनी धारेवर धरले. पण त्यांनी हात झटकत शासनाकडे निधी नाही, मी पदरमोडकरून खड्डे बुजवतोय, आता काय करणार, असा उलटा सवाल केला. यामुळे संतप्त नागरिकांनी आम्ही भिकमागो आदोलन करून तुमचे पैसे देतो असा पवित्रा घेतला. मात्र, अधिकाऱ्याच्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे नागरिक हतबल झाल्याचे दिसून आले.