गुटखा प्रकरणाने पोलिसांच्या अब्रूची लक्तरे, बदल्यांच्या घोळात खांदेपालट रखडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 05:10 PM2022-07-25T17:10:24+5:302022-07-25T17:11:33+5:30

‘लोकमत’ने दोन महिन्यांपूर्वीच वेधले होते लक्ष : निलंबनाच्या दणक्याने अनेकांना हादरा

The Gutkha case has most insulting for Beed police | गुटखा प्रकरणाने पोलिसांच्या अब्रूची लक्तरे, बदल्यांच्या घोळात खांदेपालट रखडली

गुटखा प्रकरणाने पोलिसांच्या अब्रूची लक्तरे, बदल्यांच्या घोळात खांदेपालट रखडली

Next

बीड : गुटख्याच्या कारवाईत हेराफेरी करणे पाटोदा ठाणे प्रमुखांसह दोन अंमलदारांना भलतेच महागात पडले आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी त्यांचे तडकाफडकी निलंबन केल्याने गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी- अंमलदारांना जबर हादरा बसला आहे. मात्र, घडल्या प्रकारामुळे पोलिसांच्या अब्रूची लक्तरे निघाली असून, ‘लोकमत’ने दोन महिन्यांपूर्वीच पोलीस निरीक्षक दर्जाच्या ठाण्यांचा कारभार सहायक निरीक्षकांना दिल्याच्या बाबीकडे लक्ष वेधले होते. बदल्यांच्या घोळात खांदेपालट रखडली असून, सक्षम अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे.

कर्नाटकातून अहमदनगरला कंटेनरमधून (एमएच १४-जीडी ३१५०) गुटखा वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून केजचेे सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांनी पाटोदा पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. येवलवाडी फाट्याजवळ दि. २० जुलै रोजी सायंकाळी पकडला होता. त्यात ५० पोते गुटखा होता. मात्र, यानंतर कंटेनर हुले कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात नेऊन तेथे २३ पोती उतरवून घेतली होती. याची किंमत १६ लाखांच्या घरात आहे. विशेष म्हणजे हा गुटखा नंतर एका माफियाला विक्री केल्याची माहितीही समोर आली आहे.

मुद्देमालाची मोजदाद पोत्यांऐवजी पुड्यात
मुद्देमालाची मोजदाद पोत्यांऐवजी पुड्यात आणि अन्न निरीक्षकांना फिर्यादी केल्याने कारवाईबाबत शंकेला वाव होता. त्यामुळे कारवाईत घोळ झाल्याची बाब वरिष्ठांच्या नजरेतून सुटली नाही. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांना चौकशीचे आदेश दिल्यावर कुमावत यांनी २१ रोजी सायंकाळी पाटोदा येथे जाऊन चौकशी केली. यात त्यांनी हुले कन्स्ट्रक्शनशी संबंधिताचा जबाब घेतला. पंकज कुमावतांच्या अहवालानंतर २३ पोती गुटखा गायब केल्याचा ठपका ठेवून अधीक्षक ठाकूर यांनी सहायक निरीक्षक डी.बी. कोळेकर, पो.ना. संतोष क्षीरसागर, कृष्णा डोके यांना निलंबित केले. तथापि, उत्कृष्ट तपास करणाऱ्यांंना दरमहा बक्षीस देण्याची योजना अधीक्षकांनी सुरू केली आहे. पाठोपाठ गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून बक्षीस व शिक्षा, असा संदेश नंदकुमार ठाकूर यांनी दिला आहे.

पीआयऐवजी एपीआयकडे पदभार
जिल्हा नियंत्रण कक्षात पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. वरिष्ठ सहायक निरीक्षकांची संख्याही मोठी आहे. त्यांना डावलून पाेलीस निरीक्षकांचा दर्जा असलेल्या केज, पेठ बीड, धारूर, परळी ग्रामीण, पाटोदा, तसेच माजलगाव ग्रामीण या ठाण्यांत सहायक निरीक्षक कारभारी आहेत. पाटोद्याचे डी.बी. कोळेकर यांच्या निलंबनानंतर उपनिरीक्षक राहुल पतंगे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात पदभार सोपविला आहे.

आवश्यक ते बदल केले जातील.
शासनस्तरावरूनच बदल्यांना स्थगिती दिली गेली आहे. त्यामुळे ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांचे फेरबदल व नवीन नियुक्त्या रखडलेल्या आहेत. बदल्यांना परवानगी मिळाल्यावर आवश्यक ते बदल केले जातील.
- नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड

Web Title: The Gutkha case has most insulting for Beed police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.