अधिकारी-नेत्यांची मिलीभगत, राज्यात वक्फ बोर्डच्या मालमत्तेचा सर्वाधिक गैरव्यवहार बीडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 02:02 PM2022-03-17T14:02:15+5:302022-03-17T14:03:32+5:30
Waqf Board Land Scam: राज्यातील १६ पैकी ७ फौजदारी कारवाया बीड जिल्ह्यात
- संजय तिपाले
बीड : वक्फ बोर्डच्या मालमत्तेच्या बेकायदेशीर (Waqf Board Land Scam) हस्तांतर प्रकरणामुळे सध्या बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. राज्यात वक्फच्या मालमत्ता गैरव्यवहारप्रकरणी आतापर्यंत १६ गुन्हे नोंद असून, त्यापैकी सात गुन्हे एकट्या बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अधिकारी व नेत्यांनी मिलीभगत करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता घशात घातल्याचे उघड झाले आहे.
वक्फ बोर्डच्या जमिनीच्या गैरव्यवहारासंदर्भात अनेक तक्रारी होत्या. मालमत्ता खालसा करून त्या नियमबाह्यपणे भूमाफियांच्या घशात घालण्यात आल्या. वक्फ बोर्डचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करून त्याजागी खासगी लोकांची नावे सर्रासपणे लावण्यात आली. दरम्यान, वक्फ बोर्डने मालमत्ता गैरव्यवहाराविरुद्ध फौजदारी कारवाया सुरू केल्या आहेत. आष्टी पोलीस ठाणे दोन, अंभोरा, शिवाजीनगर, बीड शहर, बीड ग्रामीण, दिंद्रूड येथे प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. आष्टीतील दोन, अंभोरा ठाण्यातील एक अशा तीन गुन्ह्यांच्या तपासासाठी अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केलेली आहे.
आष्टीतील एका गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून, उर्वरित दोन गुन्ह्यांचा तपास प्रशिक्षणार्थी आयपीएस पंकज कुमावत हे करत आहेत. दरम्यान, बीड ग्रामीण व शिवाजीनगर ठाण्यात दाखल असलेल्या दोन प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला आहे. दरम्यान, तत्कालीन उपजिल्हाधिकारी डॉ.एन.आर.शेळके, प्रकाश आघाव यांच्यासह मंडळाधिकारी, तलाठी व काही ठिकाणी राजकीय पक्षांचे नेते आरोपी आहेत. डॉ. एन.आर. शेळकेला पोलिसांनी जेरबंद केले तर प्रकाश आघाव अजून फरार आहे.
एसआयटीचे सर्वच प्रकरणांवर लक्ष
वक्फ बोर्ड व देवस्थान जमिनीसंदर्भात दाखल गुन्हे व चौकशा यावर एसआयटी (विशेष तपास पथक) नियंत्रण ठेवून आहे. पोलीस महासंचालक कार्यालय, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून नियमित आढावा सुरू आहे. विशेष म्हणजे विधिमंडळ अधिवेशनातही वक्फच्या गैरव्यवहाराचा मुद्दा गाजला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही बीडमधील वक्फ घोटाळ्याच्या संदर्भात दोनवेळा बैठका घेऊन तपासाची स्थिती जाणून घेतली आहे.
देवस्थान जमीन घोटाळाही गाजणार
आष्टी तालुक्यातील आठ हिंदू देवस्थानच्या ३३० एकर जमिनीच्या गैरव्यवहाराची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केलेली आहे. त्यावरून सध्या चौकशी सुरू आहे. यात देखील गुन्हे नोंद होण्याची शक्यता आहे. हा घोटाळाही गाजण्याची शक्यता आहे.