पावसाने ओढ दिल्याचे पडसाद; पिक वाळू लागल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 04:49 PM2023-08-30T16:49:21+5:302023-08-30T16:49:46+5:30
आधीचे कर्ज आणि यंदा पाऊस नसल्याने शेतीतून उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकरी चिंतेत होता
परळी (बीड) : पावसा अभावी सोयाबीनचे पीक वाळू लागले आहे. त्यातच शेतीचे कर्ज डोक्यावर असल्याने त्रस्त झालेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बालाजी ज्ञानोबा ढाकणे ( ४५ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना आज पहाटे ( दि. ३० ) परळी तालुक्यातील वैजवाडी येथे घडली.
परळी शहरापासून जवळच असलेल्या वैजवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी ज्ञानोबा ढाकणे यांच्याकडे शेतीचे कर्ज आहे. सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतातील पिके परपु लागली आहेत. यामुळे यंदा काही उत्पन्न मिळणार नाही. डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ढाकणे यांनी शेतातील लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. माहिती मिळताच परळी ग्रामीणचे पोलीस जमीनदार रमेश तुटेवाड व पोलीस कॉन्स्टेल घरत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.