खुंटेफळ साठवण तलावाचा प्रश्न गाजला अधिवेशनात; परब यांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले...
By शिरीष शिंदे | Published: December 20, 2023 06:47 PM2023-12-20T18:47:43+5:302023-12-20T18:48:10+5:30
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील ४५ हेक्टर भूसंपादनात गैरप्रकार झाला
बीड: आष्टी तालुक्यातील साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील ४५ हेक्टर भूसंपादन प्रक्रिया संदर्भातील प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आ. अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत सांगितले की, सदरील प्रकरणी अनियमितता झाल्याची तक्रार झाली जलसंपदा विभागास प्राप्त झाली होती. परंतु, जलसंपदा विभागाने निवाड्यातील इतर घटकांच्या मूल्यांकनाची फेर तपासणी करून पाटोदा उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुधारित निवाडा जाहीर केला असल्याचे सांगितले.
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील ४५ हेक्टर भूसंपादनात गैरप्रकार झाला असून छत्रपती संभाजी नगर येथील कार्यकारी अभियंत्यांनी भूसंपादित जमीन खरेदी करण्यासाठी ३१ मार्च रोजी ३५ कोटी रुपये निधी वर्ग केला होता. हा निधी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यासाठी ८ मे रोजी पत्र दिले होते. कार्यकारी अभियंता यांनी १७ कोटी रुपये जमिनीची खरेदी न करता परस्पर वाटप केले. या प्रकाराची चौकशी केली आहे का? संबंधितावर कारवाई करण्याबाबत कोणती कारवाई केली आहे का? असा प्रश्न आ. परब यांनी उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले की, छत्रपती संभाजी नगर येथील कार्यकारी अभियंता यांनी खुंटेफळ साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील भूसंपादित जमीन सरळ खरेदी करण्यासाठी ३१ मार्च रोजी मागणीनुसार ३५.०६ कोटी रुपये निधी वर्ग केला आहे. त्या पैकी १७.१५ कोटी रुपये मोबदला मागणी केलेल्या प्रकल्पबाधितांना शासन निर्णयाप्रमाणे निधी वाटप केला आहे.
त्यानंतर भूसंपादन प्रक्रियेबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने तक्रारींची शहानिशा करणे आवश्यक असल्याने सदरील निधी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्याबाबत नांदूर मधमेश्वर कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कळविले होते. तसेच हा निधी पाटोदा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वर्ग करणे योग्य राहील असे छत्रपती संभाजी नगर येथील पाटबंधारे मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता यांनी बीड जिल्हाधिकारी यांना कळविले होते. पुढे, जलसंपदा विभागाने निवाड्यातील इतर घटकांच्या मूल्यांकनाची फेर तपासणी करून पाटोदा उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुधारित निवाडा जाहीर केला. उर्वरित मावेजा देऊन थेट खरेदीखत करुन भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाली असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.