सकाळी पदोन्नतीचे सत्कार स्वीकारणारा पोलीस उपनिरीक्षक सायंकाळी लाच प्रकरणात अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 08:13 PM2022-03-11T20:13:18+5:302022-03-11T20:13:47+5:30
सगळीकडून स्वागताचा, अभिनंदनाचा वर्षाव झाला, पण सायंकाळी एसीबीच्या बीड येथील पथकाने त्यांना लाच मागणी केली म्हणून अटक केली.
बीड: पदोन्नतीची बातमी आल्याने एका उपनिरीक्षकांचा सकाळी मित्रपरिवारांकडून सत्कार झाला, पेढेही खाल्ले, पण लाच मागणी केल्यामुळे सायंकाळी त्यांच्या हाती बेड्या पडल्या. पाटोदा पोलीस ठाण्यात लाचमागणी केल्याच्या आरोपावरुन लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ११ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ही कारवाई केली. त्यामुळे पदोन्नतीचा आनंद औटघटकेचा ठरला.
अफरोज तैमूरखाॅ पठाण (वय ३६) असे त्या उपनिरीक्षकांचे नाव आहे. ते पाटोदा ठाण्यात कार्यरत होते. राज्यातील उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षकपदी पदोन्नतीसाठी महसूल विभागाचे वाटप करुन पसंती क्रमांक मागविलेले आहेत. याची यादी ९ मार्च रोजी अपर पोलीस महासंचालकांनी जाहीर केली. या यादीत अफरोज पठाण यांचेही नाव आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून ते पदाेन्नतीचे सत्कार स्वीकारत होते. ११ मार्च रोजी त्यांच्या मित्रपरिवाराने सत्कार करुन पेढा भरविला. त्याचे फोटोही सोशल मीडियावर टाकले.
सगळीकडून स्वागताचा, अभिनंदनाचा वर्षाव झाला, पण सायंकाळी एसीबीच्या बीड येथील पथकाने त्यांना लाच मागणी केली म्हणून अटक केली. एका तक्रारदारावर जबरी लुटीचा गुन्हा होता, तपासात त्यास सहकार्य करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणी केली होती. तडजोडीनंतर
४० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. मात्र, संशय आल्याने उपनिरीक्षक पठाण यांनी लाच स्वीकारली नाही. अखेर एसीबीने त्यांना लाचमागणीच्या आरोपाखाली अटक केली. उपअधीक्षक शंकर शिंदे, हवालदार सुरेश सांगळे, हनुमंत गोरे, भरत गारदे, श्रीराम गिराम, गणेश म्हेत्रे, अविनाश गवळी आदींनी ही कारवाई केली.