चिमुकला खेळताना वाट चुकला; फेसबुकवरील फोटो पाहून म्हणाला, हेच माझे पप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 02:49 PM2022-09-15T14:49:20+5:302022-09-15T14:49:20+5:30
बीडमध्ये तीन तासानंतर हरवलेला चिमुकला पुन्हा आईच्या कुशीत
बीड : शहरात आजोळी आलेला जेमतेम चार वर्षांचा चुणचुणीत, गोंडस अन् निरागस चिमुकला. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता खेळताना वाट चुकला अन् दीड किमी अंतर भटकत राहिला. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याची आपुलकीने चौकशी केली. इकडे आईही त्याला शोधत होती. अखेर सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांच्या प्रयत्नाला तीन तासानंतर यश आले. फेसबुकवरील फोटो पाहून त्याने वडिलांना ओळखले अन् आनंदाने आईच्या कुशीत शिरला.
त्याचे झाले असे, नेकनूर (ता. बीड) येथील चार वर्षांच्या मुलाचे आजोळ अंबिका चौक परिसरात आहे. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आई घरकामात व्यस्त होती. खेळता-खेळता चिमुकला घरापासून दूर आला. पुन्हा परतीचा रस्ता न सुचल्याने तो चुकून पिंपरगव्हाण रस्त्याने चालत राहिला. या रस्त्यावर सामाजिक कार्यकर्ते किशोर गिराम यांचे घर आहे. त्यांची नजर या बालकाकडे गेली. हा रस्ता थेट नदीच्या दिशेने जाणारा होता. त्याच्या मागे-पुढे कोणी नव्हते, त्यामुळे त्यांनी त्यास जवळ घेऊन विचारपूस केली. त्याला आई-वडिलांचे नाव सांगता येत नव्हते. तो वाट चुकल्याचे स्पष्ट झाल्यावर गिराम यांनी उपअधीक्षक संतोष वाळके यांना माहिती दिली. त्यानंतर गिराम हे चिमुकल्याला घेऊन शिवाजीनगर ठाण्यात पोहोचले. इकडे त्याची आई त्याला शोधतच होती. शिवाजीनगर ठाण्यात आईला पाहून मुलाने दुडुदुडु धावत मिठी मारली. तेव्हा उपस्थित पोलीस, सामाजिक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले.
चॉकलेट, बिस्कीट देताच चेहऱ्यावर आनंद
शिवाजीनगर ठाण्यात गेल्यावर चिमुकल्याच्या चेहऱ्यावर दडपण हाेते. पो. नि. केतन राठोड, अंमलदार कुमार काळे, गणेश परजणे, पुष्पा भोसले यांनी त्यास धीर दिला. त्याच्यासाठी चॉकलेट, बिस्कीट मागवले. मायेने जवळ घेऊन त्याला बिस्कीट, चॉकलेट दिल्यावर त्याचा चेहरा खुलला. त्यानंतर त्यास पोलिसांनी बोलते केले.
आईचे नाव मम्मी, वडिलांचे नाव पप्पा...
चिमुकला आईचे नाव मम्मी, तर वडिलांचे नाव पप्पा असे सांगत होता. बऱ्याच वेळानंतर त्याने वडिलांचे खरे नाव व आडनाव सांगितले. पोलिसांनी फेसबुकवर हे नाव सर्च केले. वडिलांचा फोटो पाहून मुलाने हेच माझे पप्पा, असे सांगितल्यावर त्यावरील मोबाइलवर संपर्क करून पोलिसांनी हकिकत कळवली.
पालकांनी मुलांची काळजी घ्यावी
स्थानिकांच्या सतर्कतेमुळे त्यांनी मुलाला सुरक्षित पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे त्याच्या पालकांचा शोध घेता आला. पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी.
- केतन राठोड, पो. नि. शिवाजीनगर ठाणे