जयदत्त क्षीरसागर- रमेश पोकळेंच्या भेटीने बीड भाजपच्या भुवया उंचावल्या

By सोमनाथ खताळ | Published: April 16, 2023 03:14 PM2023-04-16T15:14:27+5:302023-04-16T15:15:04+5:30

चाय पे चर्चा : पोकळे बीड भाजपपासून दुरावले तर क्षीरसागर-भाजप जिल्हाध्यक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप

The meeting between Jaydutta Kshirsagar and Ramesh Pokle raised the eyebrows of the Beed BJP | जयदत्त क्षीरसागर- रमेश पोकळेंच्या भेटीने बीड भाजपच्या भुवया उंचावल्या

जयदत्त क्षीरसागर- रमेश पोकळेंच्या भेटीने बीड भाजपच्या भुवया उंचावल्या

googlenewsNext

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे व बीड भाजपपासून दुरावलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांची माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. निमित्त जरी पोकळे यांच्या उद्योग समुहाला भेटीचे असले तरी येथे अनेक राजकीय विषयांवर चाय पे चर्चा झाल्याची सांगण्यात येत आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि क्षीरसागर समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले असून पोकळे बीडमधील नेत्यांपासून दुरावले आहेत. त्यातच ही भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून रमेश पोकळे यांची ओळख आहे. २००९ साली त्यांच्याकडे भाजप विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. २०१० साली त्यांनी मराठवाडा शिक्षक मतदार संघाची भाजपकडून निवडणूकही लढवली. येथे पराभव झाला तरी मिळवलेल्या जवळपास १८ हजार मतांचा आकडा पाहून त्यांना २०११ साली बीड जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले. २०१९ मध्ये पोकळे यांना बाजूला करत राजेंद्र मस्के यांना जिल्हाध्यक्ष केले. पोकळे यांना भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि धाराशिव जिल्हा प्रभारी अशी जबाबदारी देण्यात आली. परंतू या काळात ते बीड भाजपपासून दुरावत गेले. भाजप नेत्या पंकजा मुंडे, खा.डॉ.प्रीतम मुंडे यांच्याशी संपर्क तुटला. असे असतानाच आता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पोकळेंची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली. क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत असल्या तरी त्यांना बीड भाजप जिल्हाध्यक्षांसह काही नेत्यांकडून विरोध होत असल्याचेही सांगण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष मस्के यांनी तर क्षीरसागरांवर थेट टीकाही केली होती. याला क्षीरसागर समर्थकांनीही उत्तर दिले होते. परंतू आता क्षीरसागरांनी नाराज पोकळेंची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. क्षीरसागरांचा भाजप प्रवेश झाला आणि विधानसभेची उमेदवारी मिळाली तर पोकळेंच्या बालाघाटासह तालुक्यातील मतदारांचा लाभ त्यांना होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

बैठक, कार्यक्रमांंचेही निमंत्रण नाही
जिल्ह्यात भाजपच्या विविध बैठका, कार्यक्रम घेण्यात येतात. परंतू प्रदेश उपाध्यक्ष पद असतानाही याचे निमंत्रण रमेश पोकळे यांना दिले जात नाही. त्यांना जाणीवपुर्वक डावलले जात असल्याचे समर्थक सांगतात. विशेष म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमालाही पोकळे अनुपस्थित असतात. यावरून मुंडेपासूनही ते दुरावल्याचे दिसते. आ.लक्ष्मण पवार, आ.सुरेश धस यांच्या संपर्कात पोकळे असतात. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीला ते हजर राहतात. यावरून जिल्ह्यातील नेत्यांशी त्यांचे पटत नाही की, नेते आणि बीड भाजप त्यांना मुद्दाम डावलत आहे, याबाबतचा प्रश्न अनुत्तरीत आहे.


क्षीरसागरांच्या भूमिकेकडे लक्ष

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर सध्या कुठल्याच पक्षात नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यांच्या संपर्कात राहिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतू अद्यापही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आम्हाला पाहुण्यांची गरज नाही, असे विधान नाव न घेता केले होते. तर जिल्हाध्यक्ष मस्के यांनी क्षीरसागर यांच्यावर गंभीर टिका केली होती. राज्यात जरी सुत जुळत असले तरी जिल्ह्यातील भाजप नेते, पदाधिकाऱ्यांकडून त्यांना विरोध होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: The meeting between Jaydutta Kshirsagar and Ramesh Pokle raised the eyebrows of the Beed BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.