मुलीच्या लग्नाला जमविलेले पैसे मुलाच्या उपचारातच संपले; आता घरही काढले विक्रीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 05:14 PM2022-12-31T17:14:06+5:302022-12-31T17:15:03+5:30

मुलाच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे ऐकून सर्व कुटुंबीयांचे हातपायच गळाले.

The money raised for the girl's marriage ended up in the boy's treatment; Now the house is also for sale | मुलीच्या लग्नाला जमविलेले पैसे मुलाच्या उपचारातच संपले; आता घरही काढले विक्रीला

मुलीच्या लग्नाला जमविलेले पैसे मुलाच्या उपचारातच संपले; आता घरही काढले विक्रीला

googlenewsNext

- पुरूषोत्तम करवा
माजलगाव (जि. बीड) :
शहरातील मोंढा भागातील अयोध्यानगर येथील एकुलत्या एक २३ वर्षीय मुलाच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या. बहिणीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे गजाननच्या केवळ तपासणीतच संपले. आता पुढील उपचारासाठी वडिलांनी घर विक्रीसाठी काढले आहे.

अयोध्यानगर भागात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेले विठ्ठल सुखदेव गायगवे हे मोलमजुरी करतात तर त्यांची पत्नी संगीता विठ्ठल गायगवे ह्या एका अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करतात. या दोघांच्या उत्पन्नातून कसाबसा घरखर्च करून मुलीच्या लग्नासाठी थोडेफार पैसे जमवून ठेवत असत. दिवाळी झाल्यानंतर मुलीसाठी सोयरीक पाहावी व तिचे लग्न करण्याचे ठरले. त्याचवेळी त्यांचा बी.काॅम.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या गजाननला दिवाळीत लक्ष्मीपूजन चालू असताना अचानक नाकातून रक्ताची गाठ पडली. कसे तरी लक्ष्मीपूजन करून शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. येथील डॉक्टरांनी गजाननला पुढील उपचारासाठी औरंगाबादला जाण्याचा सल्ला दिला. तेथे गेल्यानंतर त्याच्या पूर्ण तपासण्या करण्यात आल्या. वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी गजाननच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे सांगितले. हे ऐकून सर्व कुटुंबीयांचे हातपायच गळाले. त्यानंतर गजाननच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात वडिलांच्या किडण्याचे देखील नमुने घेण्यात आले. गजाननच्या व त्याच्या वडिलांच्या किडण्याचे नमुने जुळल्याने आता वडिलांची किडणी द्यायचे ठरले. गजानन व त्याचे वडील यांच्या तपासण्या तपासण्यामध्येच गायगावे कुटुंबाचे पाच लाख रुपये खर्च झाले. अजून पाच लाखांचा खर्च येणार आहे.

मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे संपून गल्लीतील काही नागरिकांनी थोडेफार पैसे गोळा करून दिले होते. ते उपचारात संपल्याने आता गजाननच्या वडिलांनी त्याच्या पुढील उपचारासाठी आपले छोटेसे घर देखील विक्रीसाठी काढले आहे. त्यामुळे विठ्ठल गायगवे यांनी आपल्या मुलीसाठी स्थळ पाहणे थांबवले असून मुलाला वाचविण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

जगण्याची इच्छाच राहिली नाही
आपल्या कुटुंबियाची परिस्थिती पाहता व आपल्याला झालेला आजार पाहता आपल्याला जगायची इच्छा नाही, असे वाटू लागले. त्यामुळे अनेकदा आत्महत्येचे विचार देखील आले. यामुळे रात्र रात्र झोप येत नव्हती. केवळ युट्युबवर या आजाराविषयी माहिती घेत बसायचो. दरम्यान दीड महिण्यात माझे २० किलो वजन कमी झाले.
-गजानन गायगवे, रुग्ण.

आणखी मदतीची गरज 
सीकेडी ॲन्ड स्टेज रिनल डिसीज या आजारामुळे गजाननला किडनी प्रत्यारोपण करण्याची गरज आहे. परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता हे काम करणे त्याच्यासाठी शक्य नाही. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी व समाजसेवक, सामाजिक संस्थांनी गजाननच्या किडनी प्रत्यारोपणासाठी हातभार लावणे गरजेचे आहे. मी माझ्यापरीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत करणार आहे.
- डॉ.ज्ञानेश्वर गिलबिले, गजाननवर इलाज करणारे डॉक्टर.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे आमचे कोटेशन पाठवले आहे ते अद्याप मंजूर झालेले नाही. तोपर्यंत आम्ही घर विक्रीला काढले आहे.
-विठ्ठल गायगवे, गजाननचे वडील.

Web Title: The money raised for the girl's marriage ended up in the boy's treatment; Now the house is also for sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.