हात उसने पैसे दिलेच नाही, दिलेला चेक वटेना; आरोपीस सहा महिन्यांची शिक्षा, ५० हजारांचा दंड
By शिरीष शिंदे | Published: June 29, 2024 02:25 PM2024-06-29T14:25:39+5:302024-06-29T14:26:21+5:30
बीड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचा निकाल
बीड : हातउसने घेतलेल्या पैशापोटी दिलेल्या धनादेशाचा अनादर झाला. याप्रकरणी आरोपी राजेंद्र गोवर्धन खांडे यास सहा महिन्यांची शिक्षा, हातउसने घेतलेले ३ लाख ५० हजार रुपये व ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. हा निकाल बीड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही. सी. जोशी यांनी दिला.
फिर्यादी प्रभाकर सदाशिव पवार यांचा मुलगा गणेश याचे बीड येथील एमआयडीसी येथे सदाशिव इंजिनिअरिंग वर्क्स या नावाने वेल्डिंग फॅब्रिकेशनचे दुकान आहे. सदर दुकानावर फिर्यादी अधूनमधून थांबत असतात. आरोपी राजेंद्र गोवर्धन खांडे हा त्याच्या खासगी गुत्तेदारीच्या कामास लागणारे फॅब्रिकेशनचे मटेरियल फिर्यादीच्या मुलाच्या गॅरेजमधून बनवून घेत असत. त्यामुळे राजेंद्र खांडे व गणेश पवार यांच्यामध्ये मागील पाच-सहा वर्षांपासून ओळख व मैत्रीपूर्ण संबंध होते. दरम्यान, आरोपी राजेंद्र खांडे याने २१ मार्च २०२० रोजी गणेश पवार यांना गुत्तेदारीचा व्यवसाय व घरगुती अडचणीकरिता ३ लाख ५० हजार रुपये हातउसने मागितले. यापूर्वी झालेल्या व्यवहारामुळे गणेश याने राजेंद्र खांडे याच्यावर विश्वास ठेवून ३ लाख ५० हजार रुपये दिले. दोन महिन्यांत पैसे परत दिले जातील, असा विश्वास दिला.
२१ मे रोजी खांडे यास सदरील पैसे मागितले असता, त्याने गणेश यांना स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा धनादेश दिला. सदरील धनादेश वटण्यासाठी बीड येथील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेत २६ मे २०२० रोजी टाकला असता, अपुरी रक्कम असल्याने वटला नाही. त्यामुळे गणेश यांनी खांडे याच्याशी संपर्क केला असता, उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. विधिज्ञांमार्फत धनादेशावरील रकमेच्या मागणीची नोटीस पाठविली. ती नोटीस आरोपीने मुदतीत सोडून घेतली नाही, तसेच नोटीसचे उत्तरदेखील दिले नाही. त्यामुळे प्रभाकर पवार यांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर प्रकरण दाखल केले. या प्रकरणात फिर्यादी व इतर साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सदर साक्षी पुराव्याअंती फिर्यादीने दाखल केलेल्या सबळ पुराव्यावरून आरोपी राजेंद्र गोवर्धन खांडे यास सहा महिन्यांची शिक्षा व ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. फिर्यादीच्या वतीने एस. एस. सावंत यांनी काम पाहिले.