मुंडे घराणे ३४ वर्षांनंतर प्रथमच सत्तेपासून दूर

By सोमनाथ खताळ | Published: June 7, 2024 08:22 AM2024-06-07T08:22:51+5:302024-06-07T08:25:03+5:30

भाजपसोबत एकनिष्ठ : आमदारकीपाठोपाठ पंकजांना खासदारकीचीही हुलकावणी  

The Munde family is out of power for the first time in 34 years | मुंडे घराणे ३४ वर्षांनंतर प्रथमच सत्तेपासून दूर

मुंडे घराणे ३४ वर्षांनंतर प्रथमच सत्तेपासून दूर

बीड : बीडचे नाव निघाले की, गोपीनाथ मुंडे यांची आठवण येते. १९९० ते २०२४ अशी सलग ३४ वर्षे मुंंडेंच्या घरात खासदार, आमदार आणि मंत्रिपद राहिले आहे; परंतु यावेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुंडे यांची ज्येष्ठ कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाल्याने त्यांना सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत हे कुटुंब भाजपमध्ये एकनिष्ठ राहिलेले आहे. राज्यातील मंत्री धनंजय मुंडे हे देखील मुंडे घराण्यातीलच आहेत; परंतु ते सध्या अजित पवार गटात आहेत.   

ऊसतोड कामगारांचा नेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती. १९७८ मध्ये त्यांनी रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली; परंतु पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर लगेच दोन वर्षांनी म्हणजेच १९८० मध्ये त्यांनी याच मतदारसंघातून विधानसभा लढवली. यात ते विजयी झाले आणि पहिल्यांदा आमदार झाले; परंतु नंतर १९८५ मध्ये पुन्हा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर मात्र सलग चार टर्म म्हणजेच २००४ पर्यंत ते सलग आमदार राहिले. 

२००९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. यात ते विजयी झाले. २०१४ मध्येही ते खासदार झाले. केंद्रीय मंत्रिपदही मिळाले; परंतु बीडला येत असतानाच दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे त्याच वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी डॉ. प्रीतम मुंडे यांनी विक्रमी ९ लाख मतांनी विजय मिळवला. २०१९ मध्येही त्या विजयी झाल्या. २०२४ मध्ये मात्र भाजपने डॉ. मुंडे यांच्याऐवजी त्यांची बहीण माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. परंतु, त्यांचा पराभव झाला.   

कोणाकडे कधी अन् काेणते पद?
गोपीनाथ मुंडे - १९८०, १९९०, १९९५, १९९९, २००४ आमदार, २००९ व २०१४ खासदार
पंकजा मुंडे - २००९ व २०१४ आमदार
डॉ. प्रीतम मुंडे - २०१४ व २०१९ खासदार

Web Title: The Munde family is out of power for the first time in 34 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.