प्रशासनाची बेफिकिरी; कडाक्याच्या थंडीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ती प्रसूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 02:14 PM2022-02-04T14:14:20+5:302022-02-04T14:14:53+5:30
कडाक्याच्या थंडीत बाळाला उराशी कवटाळून बसलेल्या या मातेने उपचाराला नकार देत जिल्हा प्रशासनाची बेफिकीर वृत्ती चव्हाट्यावर आणली.
बीड : घरी अठरा विश्वे दारिद्र्य, ना राहायला घर, ना हाताला काम, दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत... अशातही घरकुल मंजूर झाले. मात्र, ना जागेचा कायदेशीर ताबा मिळाला ना अनुदान आले. त्यामुळे एक कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ जानेवारीपासून उपोषणाला बसले. यातील एका महिलेची ३ फेब्रुवारी रोजी पहाटे प्रसूती झाली. (Protester women's delivery in front of the Beed Collector's office) कडाक्याच्या थंडीत बाळाला उराशी कवटाळून बसलेल्या या मातेने उपचाराला नकार देत जिल्हा प्रशासनाची बेफिकीर वृत्ती चव्हाट्यावर आणली.
व्यवस्थेने केलेल्या अन्यायामुळे पिढ्यान्पिढ्या परवड झालेल्या एका समाजातील हे कुटुंब बीड तालुक्यातील वासनवाडी येथील आहे. अप्पाराव भुजा पवार यांना दोन वर्षांपूर्वी शबरी आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले; परंतु लालफितीच्या कारभारात ते अडकले. जागेचा मालकीहक्क व घरकुलाचा हप्ता मिळावा यासाठी अप्पाराव पवार यांनी प्रशासनाचे उंबरठे झिजविले. मात्र, प्रश्न मार्गी लागला नाही. तीन महिन्यांत दोन वेळा आंदोलने करूनही दखल न घेतल्याने २४ जानेवारी २२ पासून ते कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. कविता अप्पाराव पवार, बाबा अप्पाराव पवार, गणेश चंदर पवार, अप्पाराव यांची पुतणी मनीषा विकास काळे, असे सगळे आंदोलन करत आहेत. मनीषा काळेला ३ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजता प्रसववेदना जाणवू लागल्या. अंधाऱ्या रात्री ओट्यावरील पाणवठ्याच्या आडोशाला तिने मुलाला जन्म दिला. तीन वर्षांची पल्लवी व दीड वर्षाचा परशा ही तिला पहिली दोन मुले असून, आता हा नवा पाहुणा आला आहे.
उपचारास नकार, माय-लेक ठणठणीत
३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता शिवाजीनगर ठाण्याचे पो.नि. केतन राठोड हे रुग्णवाहिकेसह आंदोलनस्थळी पोहोचले. मात्र, उपचार घ्यायचा नाही, असा पवित्रा अप्पाराव पवार यांनी घेतला. त्यामुळे पोलीस माघारी परतले. माय-लेक ठणठणीत आहेत. मात्र, रात्री आठ वाजेपर्यंत प्रशासन सुस्तच होते.
आसू अन् हसू...
मांगवडगाव (ता. केज) येथे जमिनीच्या वादातून तिघांची निर्घृण हत्या केल्याची घटना २०२० मध्ये झाली होती. यातील मयत प्रकाश पवार यांची मनीषा काळे ही मुलगी आहे. वडिलांच्या ५ मारेकऱ्यांना २ फेब्रुवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. दुसऱ्याच दिवशी मुलगा झाल्यामुळे मनीषाच्या एका डोळ्यात आसू, तर दुसऱ्यात हसू होते.