सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 19:15 IST2024-10-30T19:14:26+5:302024-10-30T19:15:37+5:30
छाननी दरम्यान दहा उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वेगवेगळ्या कारणाने अवैध ठरविण्यात आले.

सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
परळी (बीड) : परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ५८ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परळीचे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांच्याकडे दाखल केले होते. या ५८ उमेदवारांच्या ७२ उमेदवारी अर्जाची बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात छाननी झाली. छाननी दरम्यान दहा उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वेगवेगळ्या कारणाने अवैध ठरविण्यात आले. तर ४८ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी परळी विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहेत.
नामनिर्देशन पत्र अवैध ठरलेल्यामध्ये एजाज इनामदार, अलका सोळंके, करुणा मुंडे, शंकर शेषराव चव्हाण, अन्वर पाशा शेख व आवेसोदीन जलीलमिया सिद्दिकी ,दत्ता किसन दहिवाळ, श्रीकांत चंद्रकांत पाथरकर, रमेश फड यांच्या अर्जाचा समावेश आहे.
सूचक म्हणाले, सही आमची नाही
करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्तीसेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जामध्ये सूचकांच्या नावा पुढे केलेल्या सह्या आपल्या नसल्याचे सुचकांनी आजच्या नामनिर्देशनपत्र छाननी वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे करुणा मुंडे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.
मनसेच्या आधी एकाची माघार, आता दोघांचे अर्ज बाद
या मतदारसंघातून अभिजीत देशमुख यांना मनसेनेअधिकृत उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रणांगणातून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे मनसेच्या वतीने दत्ता दहिवाळ व श्रीकांत पाथरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी नामनिर्देशन पत्र अपूर्ण भरले होते. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय दहिवाळ यांनी नामनिर्देशन पत्र भरताना डिपॉझिटची रक्कम भरली नव्हती. या कारणामुळे मनसेच्या दोघा उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. तसेच भारतीय जवान किसान पार्टीचे शंकर चव्हाण यांचाही नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले आहेत.
यांचे अर्ज ठरले वैध:
महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धनंजय पंडितराव मुंडे, महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (श.प )पार्टी चे उमेदवार राजेसाहेब श्रीकिशन देशमुख, अपक्ष उमेदवार राजश्री धनंजय मुंडे, जयवंत विठ्ठलराव देशमुख, राजेभाऊ फड, प्रभाकर वाघमोडे, प्रमोद बिडगर, दिलीप बिडगर, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे उमेदवार धनराज अनंतराव मुंडे यांच्यासह एकूण ४८ उमेदवारांच्या अर्जाचा समावेश आहे.