कष्टाच्या वेतनासाठी हेळसांड; महिला कामगारांचा बीड पालिकेत पुन्हा ठिय्या
By सोमनाथ खताळ | Published: February 21, 2023 02:33 PM2023-02-21T14:33:49+5:302023-02-21T14:43:03+5:30
मुख्याधिकारी निता अंधारे येत नसल्याने या महिलांनी उपमुख्याधिकारी उमेश दुधाळ यांची वाट अडवली होती.
बीड : शहरात स्वच्छता करण्यासाठी रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या महिलांना कनक एन्टर प्रायजेस या कंपनीने दोन महिन्यांचे वेतन दिले नाही. ते देण्यासह किमान वेतनानुसार नवीन वेतन द्यावे, या मागणीसाठी या सर्व महिला कामगारांनी सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत बीड पालिकेत ठिय्या आंदोलन केले होते.
मुख्याधिकारी निता अंधारे येत नसल्याने या महिलांनी उपमुख्याधिकारी उमेश दुधाळ यांची वाट अडवली होती. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री साडे अकरा वाजता या महिलांना मंगळवारी दुपारी वेतन देण्याचे अश्वासन देण्यात आले होते. परंतू दुपारपर्यंतही वेतन न मिळाल्याने या महिलांनी पुन्हा बीड पालिकेत ठिय्या मांडला होता. विशेष म्हणजे या महिलांचे आंदोलन सुरू असतानाही मुख्याधिकारी व उपमुख्याधिकारी हे दोघेही कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे या महिलांमधून संताप व्यक्त करण्यात आला.