पाऊस गायब! राज्याची ऊर्जा नगरी परळीत लोडशेडिंग घरोघरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 02:43 PM2023-08-31T14:43:28+5:302023-08-31T14:43:51+5:30

विजेच्या लपंडावाने सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्ग त्रस्त झाला असून वीज वितरण कंपनीच्या विरोधात असंतोष वाढत आहे

The rain disappeared! Door-to-door load shedding in the state's energy city Parali | पाऊस गायब! राज्याची ऊर्जा नगरी परळीत लोडशेडिंग घरोघरी

पाऊस गायब! राज्याची ऊर्जा नगरी परळीत लोडशेडिंग घरोघरी

googlenewsNext

- संजय खाकरे
परळी( बीड) :
पाऊस गायब झाल्याने कृषिपंप, पंखे, वातानुकूलित यंत्रे व इतर वापरासाठी पावसाळ्यात विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीकडून ऊर्जा नगरी असलेल्या परळी शहरातच अचानक वीज भारनियमन ( इमर्जन्सी लोडशेडिंग) सुरु झाले. अनेक दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने परळीकरांचे हाल होत आहेत. 

येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता पद गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त असल्याने वीज वितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंताच्या कार्यालयात कोणाचा पायपोस कोणाला राहिला नाही. परिणामी वीज ग्राहकात असंतोष पसरला आहे. मागील आठ दिवसांपासून परळी शहरात कुठलीही पूर्वसूचना न देता वारंवार वीज पुरवठा बंद होत आहे. आधीच पाऊस न झाल्यामुळे गर्मीचे प्रमाण जास्त झाले आहे. वयोवृद्ध नागरिकांचे व बालकांचे यामुळे हाल होत आहेत. तसेच वातावरण बदलल्यामुळे डासांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यात सतत चालू असलेल्या विजेचा लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

मंगळवार दि 29 ऑगस्ट रोजी परळीतील गणेशपार भागासह गावभागात रात्री उशिरा अचानक दोन तास लाईट गेली. यामुळे नागरिकांच्या त्रासास पारावर उरला नाही. येथील वीज वितरणच्या कार्यालयात कॉल केला तर फक्त ही इमर्जन्सी लोडशेडिंग चालू असल्याचे उत्तर दिले जाते. दिवसभरातही सतत लाईट जात असल्यामुळे व्यापारी वर्ग ही त्रस्त झाला आहे. मागील सहा महिन्यांपासून वीज वितरण कार्यलयातील कार्यकारी अभियंता पद रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचाही धाक उरला नाही. सध्या सर्व कारभार शाखा अभियंता सांभाळत आहेत. 

या सततच्या विजेच्या लपंडावाने सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्ग त्रस्त झाला असून वीज वितरण कंपनीच्या विरोधात असंतोष पसरत असल्याचे दिसून येत आहे. परळीत थर्मल पॉवर स्टेशन असूनही वारंवार लाईट जाण्याचे प्रकार होत असतात. यामुळे जनतेत रोष वाढत आहे. 

ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रिया 
अन्यायकारक लोडशेडिंग त्वरित बंद करण्यात यावी. अन्यथा विजवितरण कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल. 
- अश्विन मोगरकर, सामाजिक कार्यकर्ते

वेळप्रसंगी बिल भरले नाही तर विद्युत पुरवठा बंद करतात. मात्र लोडशेडिंग किंवा कुठल्याही कारणाने सतत वीज घालवत असतात. वारंवार होणारी लोडशेडिंग त्वरित बंद करण्यात यावी.
-राजन वाघमारे ,परळी

परळी येथील जी 1 फिडरमध्ये इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे वीज पुरवठा अनेक वेळा बंद करण्यात येतोय.संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांना इमर्जन्सी लोडशेडिंग म्हणजे काय विचारल्यावर 'आम्हांलाही नक्की काय ते ठाऊक नाही' असे उत्तर मिळाले, शासन आपल्या दारी .. आणि लोडशेडींग घरोघरी .. असाच प्रकार चालू आहे
- अनिरुद्ध जोशी, परळी 

विजेची मागणी वाढली 
पावसाने दडी मारल्याने विजेची मागणी वाढली आहे त्यामुळे इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू आहे
- अभिजीत राठोड, शाखा अभियंता वीज वितरण कार्यालय परळी

Web Title: The rain disappeared! Door-to-door load shedding in the state's energy city Parali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.