बीड जिल्ह्यात पावसाने सलामी दिली; पण धरणांची पातळी नाही वाढली
By शिरीष शिंदे | Updated: June 19, 2024 17:20 IST2024-06-19T17:19:41+5:302024-06-19T17:20:22+5:30
मोठ्या पावसाची प्रतीक्षा, धरणात ३ टक्केच जीवंत पाणीसाठा

बीड जिल्ह्यात पावसाने सलामी दिली; पण धरणांची पातळी नाही वाढली
बीड : १ जूनपासून बीड जिल्ह्यात चांगल्या पावसाला सुरुवात झाली असली तरी त्याचा लाभ लहान-मोठ्या धरणांना झाला नाही. अद्याप ६२ धरणे जोत्याखालीच असून केवळ ३ टक्केच जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळ्याची सुरुवात मृग पावसाने झाली असल्याने पुढील काळात मोठे पाऊस होऊन धरणे भरतील अशी सकारात्मक आशावाद शेतकऱ्यांतून व्यक्त केला जात आहे.
आतापर्यंतच्या अनुभवानुसार, जून महिन्यात फारसा पाऊस होत नाही. त्यामुळे पेरण्या मागे पुढे होतात, त्याचा परिणाम उत्पादनावर सुद्धा होतो. परंतु यंदा जून महिना सुरू होण्यापूर्वी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळी बाजरीचे नुकसान झाले तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच काही ठिकाणी गारांचा पाऊस सुद्धा झाला होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने जोर धरला होता. त्यानंतर १ जूनपासून मौसमी पावसाला सुरुवात झाली होती. बीड जिल्ह्यात १ ते १२ जून या कालावधीत १२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात पेरणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्हाभरात ४.९१ टक्के पेरणी झाली आहे. वास्तविक: धरण क्षेत्रात हा पाऊस झालेला नाही. काही भागात नद्यांना पाणी आल्याचे दिसून आले मात्र धरणे अद्यापही कोरडीच आहेत. सध्याच्या पावसाची सकारात्मक स्थिती पाहता पुढील काळात मोठे पाऊस होऊन धरणे भरतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
३.३५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा
बीड जिल्ह्यात लहान मोठ्या १४३ धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा २३.९८९ दलघमी असून त्याची टक्केवारी ३.३५ एवढी आहे. जिल्ह्यात सर्वात मोठ्या माजलगाव प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा राहिलेला नाही तर मध्यम व लघु गोदावरी खोऱ्यातील प्रकल्पात २३.९८९ दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. प्रकल्पातील पाणीसाठा कमी आहे. नुकत्याच झालेल्या पावसाचा फारसा परिणाम धरणांमध्ये दिसून आलेला नाही.
अशी आहे प्रकल्पातील पाणी परिस्थिती
प्रकल्प-२५ टक्के पाणी-जोत्याखाली-कोरडे प्रकल्प
माजलगाव-०-१-०
मध्य-४-७-४
लघु-१९-५४-४५
एकूण-२३-६२-४९
अद्यापही टँकर सुरूच
जिल्हाभरात मागील १२ दिवसांमध्ये चांगला पाऊस हाेत असला तरी सर्व परिस्थिती बदलली अशा मधला भाग नाही. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यानंतर पाणी पातळी वाढते. त्यानंतर कोरड्या पडलेल्या विहीर, बोअरला पाणी येते. आता पाऊस झाला अन् लगेचच पाणी येईल असे होत नाही. अनेक पाऊस झाल्यानंतर धरणात पाणी वाढेल, मग जमिनीतील पाणी पातळी वाढल्यानंतर ग्रामीण भागातील पाणी प्रश्न मार्गी लागले.
धरण क्षेत्रात पाऊस होणे आवश्यक
सद्यस्थितीला ग्रामीण भागात पाऊस होत आहे. परंतु धरण क्षेत्रात मोठे पाऊस होणे आवश्यक आहेत. मागच्या वर्षी सरासरीच्या एकूण ७१ टक्के पाऊस झाला होता. परंतु धरणात पाणीसाठाच झाला नव्हता. त्यामुळे आगामी पाऊस धरण क्षेत्रात झाल्यास त्या-त्या भागातील पाणी परिस्थितीमध्ये सुधारणा होते. तसेच शेतीसाठी मुबलक पाणीसाठा निर्माण होता.