शेत मालकाच्या अल्पवयीन मुलीवर सालगड्याचा अत्याचार; गुढी पाडव्याच्या दिवशीची घटना
By सोमनाथ खताळ | Published: March 23, 2023 06:45 PM2023-03-23T18:45:54+5:302023-03-23T18:46:23+5:30
गुढी पाडव्याच्या दिवशी शेतात कोणीही नसल्याचा फायदा घेत ८ वर्षीय बालिकेवर केला अत्याचार
केज : ज्या मालकाच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होता, त्यांच्याच आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. केज तालुक्यातील एका गावात गुढी पाडव्याच्या दिवशी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मुळचा लातूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या या आरोपीला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना
गुढी पाडव्याच्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता सालगड्याने शेतात कोणीही नसताना शेतमालकाच्याच ८ वर्षीय बालिकेला गोठ्यापासून काही अंतरावर असलेल्या शेतात नेले. तिच्यावर अत्याचार केला. सायंकाळी आईला पाहून पीडित मुलगी रडू लागली. यावर रडायला काय झाले? असे आईने विचारले. यावेळी तिने सालगड्याने केलेल्या अत्याचाराची हकीकत सांगितली. मुलीच्या आईने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा केज पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंक पथकाच्या महिला पोलीस उप निरीक्षक सीमाली कोळी यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. पीडित मुलीवर केजच्या उपज़िल्हा रुग्णालयात उपचार करून वैद्यकीय तपासणी अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात करण्यात आली. दरम्यान आरोपीला अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हा व सत्र न्यायालया समोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस २५ मार्च पर्यंत पोलीस कोठाडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.