जीर्णोद्धाराचे काम युध्द पातळीवर, भाविकांना शेडमध्येच घ्यावे लागणार पुरूषोत्तमाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 02:29 PM2023-07-14T14:29:36+5:302023-07-14T14:29:57+5:30
मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने शेडमध्ये ठेवली मूर्ती
- पुरुषोत्तम करवा
माजलगाव: पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तमाच्या मंदिराच्या जीर्णोदराचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे आठ दिवसांवर आलेल्या अधिक मासात भाविकांना मंदिरा ऐवजी शेडमध्येच पुरूषोत्तमाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.
भारतात एकमेव असलेल्या पुरुषोत्तमाच्या मंदिराचे काम मागील दोन महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे. यासाठी शासनाकडून करोड रुपये खर्च करण्यात येत आहेत. १८ जुलै रोजी अधिक मास ( धोंड्याचा महिना ) सुरू होत आहे. भारतात एकमेव माजलगाव तालुक्यात पुरुषोत्तम पुरी येथे पुरुषोत्तमाचे मंदिर आहे. या महिन्याभराच्या कार्यकाळात संपूर्ण भारतातून लाखोच्या संख्येत भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
मंदिराच्या जीर्णोदराचे काम सुरू असल्याने व भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर ट्रस्टच्यावतीने एका रिकाम्या जागेत भव्य असा शेड उभा करण्यात आला आहे. या शेडमध्ये भाविकांना दर्शन घेता येणार आहे . पावसाळ्याचे दिवस असल्याने व या ठिकाणी रस्ते नसल्यामुळे चिखल मोठ्या प्रमाणात होणार असल्याने भाविकांची मात्र तारांबळ होणार आहे.
या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने बैठक घेण्यात आली असली तरी या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने भाविकांना या ठिकाणी जाण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. यावर प्रशासनाने कसल्याच प्रकारची उपाय योजना न केल्याने भाविकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी दिसून येत आहे.
भाविकांसाठी शेड उभारले
पुरुषोत्तमाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अधिक मास महिना सुरू होत असल्याने व भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही भव्य असे शेड उभा केले आहे. या शेडमध्ये भाविकांना चांगल्या प्रकारे दर्शन घेता येणार आहे.
- विजय गोळेकर,अध्यक्ष, पुरुषोत्तम मंदिर