परळी विधानसभेचा 26 फेऱ्यात लागणार निकाल; धनंजय मुंडे अन् राजेसाहेब देशमुखांत थेट लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 04:35 PM2024-11-22T16:35:55+5:302024-11-22T16:37:24+5:30
परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे.
- संजय खाकरे
परळी: विधानसभेच्या निवडणुकीसाठी परळी विधानसभा मतदार संघातील 363 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली असून 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता येथील शक्तीकुंज वसाहतीतील नवीन क्लब बिल्डींग मध्ये मतमोजणीस प्रारंभ होणार आहेत. मतमोजणीची निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून तयारी करण्यात आली आहे. परळी विधानसभा मतदारसंघात 75.27% मतदान झाले आहे. एकूण तीन लाख 37 हजार 966 एवढे मतदार असून त्यापैकी दोन लाख 54 हजार 383 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या शक्ती कुंज वसाहतीतील नवीन क्लब बिल्डिंगमध्ये मतपेट्या ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी कडेकोट पोलीस बंद ठेवण्यात आला आहे. सध्या तीन पोलीस निरीक्षक 12 एपीआय, पीएसआय 54 पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ व सीआरपीएफचे एक प्लेटून बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेले आहेत. उद्या मतमोजणी वेळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आज दुपारी चार नंतर नेमण्यात येणार आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजता प्रारंभ होणार असून दुपारी दोन दरम्यान मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती परळीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी परळी ते तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी,बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी महिंद्रकुमार कांबळे, परळीचे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्रिंबक कांबळे, तेजस्विनी जाधव, व्यंकटेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी होणार आहे.
26 फेऱ्यात लागणार निकाल
परळी मतदारसंघातील अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा पवार गटा) धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल असून. मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या होणार आहेत. डीग्रस या गावातील मतांच्या सर्वात प्रथम मतमोजणी होणार आहे. तर बागझरी येथील मतांची सर्वात शेवटी मतमोजणी होणार आहे. प्रत्येक मतमोजणी टेबलवर चार अधिकारी व कर्मचारी नियुक्त असतील असे एकूण 56 अधिकारी कर्मचारी हे काम पाहणार आहेत. तर टपाली मतपत्रिका मोजण्यासाठी सहा टेबल ची सोय करण्यात आली आहे व सैन्य दलातील मतदारांची मतमोजणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
मुंडे विरुद्ध देशमुख थेट लढत
परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे.
महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या जमेच्या बाजू :
गेल्या बावीस वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य ते कृषी मंत्री या पदाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांचा परळी मतदारसंघात कार्यकर्ते, मतदारांशी असलेला थेट संपर्क, केलेली विकासाची कामे, लोकांचे सोडविलेलेलेले प्रश्न तसेच त्यांची प्रचाराची व कामाची यंत्रणा चांगली होती. ओबीसी समाज धनंजय मुंडे यांच्या बाजूने एकवटला गेला. तसेच भाजपाचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची साथ धनंजय मुंडे यांना मिळाली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या जमेच्या बाजू :
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ, बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांची साथ, महाविकास आघाडीच्या परळीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेले काम. मराठा चेहरा म्हणून राजकीय क्षेत्रात परळी मतदारसंघात आलेले महत्व. बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सभापतीपद भूषविल्यामुळे मतदारांशी जवळून संपर्क.