सर्पमित्राने जीव धोक्यात घातला; जखमी ९ फुटी अजगराला विहिरीतून काढत दिले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 03:46 PM2022-12-23T15:46:32+5:302022-12-23T15:50:07+5:30
शेतातील विहिरीतमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तब्बल ९ फुटाचा अजगर जाळीत जखमी अवस्थेत अडकला होता.
- सखाराम शिंदे
गेवराई (बीड) : तालुक्यातील पांढरवाडी येथील एका शेतकऱ्यांच्या विहिरीत गेल्या तीन दिवसांपासून एक अजगर जाळीत अडकून पडले होते. जखमी झालेल्या या तब्बल ९ फुटाच्या अजगराची गुरुवारी रात्री येथील सर्वमित्राने मोठ्या प्रयत्नातून सुटका केली. अजगराला वनाधिकारी यांच्या समवेत वनक्षेत्रात सोडण्यात आले.
साप दिसला कि सर्वसामान्य नागरीकाच्या अंगावर काटा येतो व फितीने घाबरून जातो. तालुक्यातील पांढरवाडी येथील शेतकरी सुखदेव जाधव यांच्या शेतातील विहिरीतमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तब्बल ९ फुटाचा अजगर जाळीत जखमी अवस्थेत अडकला होता. शेतकऱ्यांने सर्पमित्र बप्पा कानाडे यांना याची माहिती दिली.
त्यानंतर सर्पमित्र बप्पा कानाडे, राहुल शेलार, प्रेम वाघमारे, बाळु राऊत व शेतकरी विहिरीजवळ पोहचले. सर्पमित्र कानाडे जीव धोक्यात घालून पाण्यात उतरले. मोठ्या शिताफीने अडकलेल्या अजगराला त्यांनी सुखरूप बाहेर काढले. अजगरावर योग्य उपचार करण्यात आले. वन अधिकारी लक्ष्मण गाडे यांच्या समवेत अजगराला पालख्या डोगराजवळील वनक्षेत्रात सोडून देण्यात आले. सर्पमित्राने जीव धोक्यात घालून केलेल्या प्रयत्नांमुळे जखमी अजगराला जीवदान मिळाले. त्यामुळे सर्पमित्राचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.