धक्कादायक! मृत वडिलांच्या ओळखपत्रावर स्वतःचा फोटो लावून मुलाने विकली जमीन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 08:04 PM2023-05-05T20:04:35+5:302023-05-05T20:05:01+5:30
या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आठ जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल
- नितीन कांबळे
कडा (बीड): मयत वडिलांच्या मतदान कार्डवर मुलाने स्वतःचा फोटो लावून जमिनीची विक्री केल्याची घटना आष्टी तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दुय्यम निबंधकांच्या फिर्यादीवरून ३ मे रोजी आष्टी पोलिस ठाण्यात आठ जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील कारभारी आंधळे हे २०१४ रोजी मयत झाले आहेत. त्यांच्या मतदान ओळखपत्रावर मुलगा नारायण याने स्वतःचा फोटो लावून बनावट ओळखपत्र बनवले. त्यानंतर मयताच्या नावाचा वापर करून नारायण कारभारी आंधळे, अंबादास आंधळे, जिजाबा गर्जे, बाबासाहेब आंधळे, रावसाहेब आंधळे यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत ( दस्त क्रमांक ६५७\२०१५,दि.१३\११\२०१५ ,दस्त क्रमांक ६६७\२०१५ दि.११\३\२०१५ , दस्त क्रमांक २११२\२०१६ दि.२९\७\२०१६ ) बनवले. यावेळी राजु आंधळे, आप्पासाहेब आंधळे, आजिनाथ आंधळे यांनी सदरचे खरेदीखत बनवतांना खोटी साक्ष दिली. दरम्यान, हा बनाव उघडकीस आल्याने दुय्यम निबंधकांची फसवणूक झाल्याचे पुढे आले.
या प्रकरणी दुय्यम निबंधक घनश्याम कृष्णा खेडसकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी नारायण कारभारी आंधळे, अंबादास पांडुरंग आंधळे, जिजाबा निवृत्ती गर्जे, बाबासाहेब देवराम आंधळे, आप्पासाहेब सुभाषराव आंधळे, आजिनाथ सुभाषराव आंधळे ( सर्व रा.लिंबोडी) व राजु काशिनाथ आंधळे ( रा.कडा) या आठ जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख करीत आहेत. आरोपी फरार असून पोलिस शोध घेत आहेत.