कोंबिग ऑपरेशनचे यश, पोलिसांनी पाठलाग करत वर्षभरापासून फरार आरोपीस घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 07:53 PM2022-11-01T19:53:53+5:302022-11-01T19:54:28+5:30
आष्टी तालुक्यातील अंभोरा ठाणे हद्दीतील वाहीरा येथे २०२१ मध्ये घरफोडी प्रकरणात होता फरार
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : घरफोडी प्रकरणातील आरोपी वर्षांपासून अंभोरा पोलिसांना गुंगारा देत होता. आज पहाटे कोंबिग ऑपरेशन दरम्यान एक किलोमीटर अंतरावर पाठलाग करून आष्टी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत अंभोरा पोलिसांच्या ताब्यात दिला. सचिन मिश्रीलाल चव्हाण असे आरोपीचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा ठाणे हद्दीतील वाहीरा येथे २०२१ मध्ये घरफोडी करून १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. यात तीन आरोपींचा समावेश होता. दोघा जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. तर सचिन चव्हाण हा वर्षांपासून अंभोरा पोलिसांना हवा होता. तो कायम गुंगारा देत असल्याने पोलिसांना मिळून येत नव्हता.
दरम्यान, आज आष्टीचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस याच्यासह पोलिस उपनिरीक्षक राजेद्र विसंबर पवार, पोलिस हवालदार बाबासाहेब राख ,पोलिस अंमलदार सचिन गायकवाड यांच्या टीमने कोंबिग ऑपरेशन मोहीम राबवली. सचिन मिश्रीलाल चव्हाण ( रा. पिंपरखेड ता.आष्टी) हा पळून जात असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा सकाळी साडेआठच्या सुमारास पोलिसांनी एक किलोमीटर पाठलाग करत सचिनला शेरी खुर्द येथे ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीस अंभोरा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने करीत आहेत.