तीन पिढ्यांचे समर्पण, तापलेल्या भट्टीजवळ १२ ते १५ तास श्रमातून साकारतो साखरगाठींचा गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 07:11 PM2022-03-17T19:11:14+5:302022-03-17T19:13:44+5:30

होळी आणि गुढीपाडव्याचे वेध लागताच महाशिवरात्रीपासून साखरगाठींच्या कारखान्यांची भट्टी पेटते.

The sweetness of Sakhargathi is obtained through hard work near the heated furnace | तीन पिढ्यांचे समर्पण, तापलेल्या भट्टीजवळ १२ ते १५ तास श्रमातून साकारतो साखरगाठींचा गोडवा

तीन पिढ्यांचे समर्पण, तापलेल्या भट्टीजवळ १२ ते १५ तास श्रमातून साकारतो साखरगाठींचा गोडवा

googlenewsNext

- अनिल भंडारी
बीड : होळी आणि विशेषत: गुढीपाडव्याला महत्व असलेल्या साखरगाठी बनविण्याचे काम येथील कारखान्यांमध्ये सुरू आहे. तापलेल्या भट्टीजवळ बारा ते पंधरा तास कामगारांच्या श्रमातून साखरगाठींचा गोडवा शहरातील १५ प्रमुख कुटुंबांसह दीडशेपेक्षा जास्त कामगारांचे कुटुंब चाखत आहेत.

होळी आणि गुढीपाडव्याचे वेध लागताच महाशिवरात्रीपासून साखरगाठींच्या कारखान्यांची भट्टी पेटते. ऐनवेळी कोरोना लॉकडाऊनमुळे २०२०मध्ये साखरगाठी करणाऱ्यांना आर्थिक फटका बसला. २०२१मध्ये दिलासा मिळाला. परंतु विक्री घटली. यंदा तशी परिस्थिती नसल्याने साखरगाठी बनविणाऱ्यांचे धाडस वाढले आहे. बीड शहरात जवळपास १५ कुटुंब साखरगाठीच्या व्यवसायात अनेक वर्षांपासून रमलेली आहेत. एक- दोन कुटुंब तर तीन पिढ्यांपासून कारखाना चालवतात. मजुरांची उपलब्धता, साखर व इंधनाची तजवीज करून कामाला सुरूवात करतात. यामुळे शेकडो लोकांना राेजगाराची सोय झाली आहे.

...तर घामाघूम व्हाल
कारखान्यात क्षणात घामाघूम होईल, अशी उष्णता पेटलेल्या भट्ट्यांमुळे असते. तापलेल्या भट्टीवर साखरेच्या द्रावणात दूध व लिंबाचा वापर करून पांढराशुभ्र पाक ठराविक तापमानात दोघेे तयार करतात. नंतर इतर कामगार तयार पाक दोऱ्यासह लाकडी साच्यांमध्ये भरतात. काही वेळेत आकाराप्रमाणे साखरगाठी तयार होतात.

१२ तास भट्टीजवळ
मुख्य कारागिरासह मजूर तापलेल्या भट्टीजवळच १२ ते १५ तास साखरगाठी बनविण्यात व्यस्त असतात. उपलब्ध क्षमतेनुसार साखरगाठींचे दररोज उत्पादन केले जाते. गत काही महिन्यांपासून महागाईचा अंदाज घेत साखरेच्या खरेदीमुळे भाववाढीचा फारसा फरक पडत नसल्याचे संतोष काजळे यांनी सांगितले.

बीडची साखरगाठी परजिल्ह्यातही
बीडमधील उत्पादकांची साखरगाठी शुभ्रतेच्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे बीड जिल्हा तसेच औरंगाबाद, जालना, नगर, पुणे बारामती, कुंथलगिरीसह इतरत्र विकली जाते. गतवर्षी बाजाराचा अंदाज घेऊनच गाठीचे उत्पादन केल्याचे रमेश कांबळे यांनी सांगितले.

साखरगाठीची तिसरी पिढी
निजामकाळातील चौथी पास असलेले पेठ बीड भागातील १०५ वर्षांचे सटवाजी यमनाजी कांबळे १५ वर्षांपासून लोकमत वाचतात. ते म्हणाले, आई - वडील साखरगाठी बनवायचे, त्यांच्या हाताखाली काम करायचो. नंतर जबाबदारी आली आणि ती पेलली. आता मुले, नातवंडे कारखाना चालवतात. साखरगाठीसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. मजुरांची काळजी घ्यावी लागते. कोणताही अपघात होऊ नये म्हणून सावध राहावे लागते. अलिकडच्या काही वर्षात मजूर कमी झालेत. जे मिळतात, ते रोजंदारीऐवजी उत्पादनावर मजुरी ठरवतात.

Web Title: The sweetness of Sakhargathi is obtained through hard work near the heated furnace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.