साखर कारखान्यातील कामगाराची दुचाकी चोरी; विक्रीसाठी येताच हाती पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By सोमनाथ खताळ | Published: February 16, 2024 07:24 PM2024-02-16T19:24:17+5:302024-02-16T19:24:42+5:30
तेलगाव येथील पंपावर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती
बीड : माजलगाव तालुक्यातील जयमहेश साखर कारखान्यातील कामगाराने पार्किंगमध्ये उभा केलेली दुचाकी चोरट्यांनी पळविली होती. याबाबत तपास केल्यानंतर ही दुचाकी विक्री करण्यासाठी दोन चोरटे तेलगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. एक चोरटा हा अल्पवयीन आहे
रोहन पांडुरंग गायकवाड (रा.कल्याण नगर, माजलगाव) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. गणेश यशवंत उजगरे (रा. लोणगाव ता. माजलगाव) हे पवारवाडी येथील जय महेश साखर कारखाना येथील विद्यूत विभागात काम करतात. २५ जानेवारीला ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. आपली दुचाकी त्यांनी पार्किंगमध्ये उभा केली. बाहेर आल्यावर त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांनी माजलगाव पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला.
ही दुचाकी माजलगावमधील रोहन गायकवाड याने चोरली असून तो १६ फेब्रुवारी रोजी तेलगाव येथील पंपावर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा लावला. पंपावर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतली. चौकशी केल्यानंतर त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या दाेघांनाही माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.