वाचवा वाचवा! जीवाच्या आकांताने काका धावत होते, पुतण्याने गाठून कोयत्याने केले सपासप वार
By संजय तिपाले | Published: November 26, 2022 12:36 PM2022-11-26T12:36:40+5:302022-11-26T12:39:19+5:30
पहाटेचा थरार, पुतण्याने घरात घुसून केला काका-काकूवर हल्ला, काकाचा मृत्यू तर इतर तिघे गंभीर जखमी
बीड: वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे कौटुंबिक वादातून चुलत्याने पुतण्याचा खून केल्याच्या घटनेला ४८ तासही उलटत नाहीत तोच बीड तालुक्यातील मुळूक येथे शेतीवादातून धारदार कोयत्याने सपासप वार करुन वृध्द चुलत्याचा खून केल्याची घटना २६ नोव्हेंबरला पहाटे घडली. अन्य चौघे जखमी असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बळीराम मसाजी निर्मळ (७५) असे मयताचे नाव आहे. त्यांच्या पत्नी केशर बळीराम निर्मळ (६५), चोकाजी निर्मळ (८०), कांताबाई निर्मळ (६०) हे जखमी आहेत. रोहिदास विठ्ठल निर्मळ हा बळीराम यांचा पुतण्या आहेत. निर्मळ कुटुंबीयांमध्ये शेतीवरुन वाद सुरु होता. यातून २६ नोव्हेंबरला पहाटे बळीराम यांच्यासह पत्नी केशर यांच्यावर रोहिदास याने कोयत्याने हल्ला चढविला. जीव वाचविण्यासाठी बळीराम हे घरातून बाहेर धावत सुटले. रस्त्यावर गाठून रोहिदासने सपासप वार केल्याने जे जागीच मृत्यमुखी पडले.यावेळी वाद सोडविण्यास आलेल्या चोकाजी व कांताबाई निर्मळ यांनाही त्याने मारहाण केली.
दरम्यान, यानंतर बळीराम यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सोडून रोहिदाने पोबारा केला. ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेतून चारही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यापैकी केशर निर्मळ या गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक मुस्तफा शेख, उपनिरीक्षक विलास जाधव, अजय पानपाटील, अंमलदार दत्तात्रय बळवंत , गोविंद राख, सचिन मुरुमकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
आरोपीच्या मागावर पथके
दरम्यान, घटनास्थळी रक्ताने माखलेला कोयता आढळून आला, तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आरोपी रोहिदास निर्मळ हा फरार असून त्याच्या मागावर पथके रवाना करण्यात आली आहेत.