उद्धवसेनेचा उमेदवार पडला, तर शिंदेसेनेला उमेदवारीच नाही; बीडमध्ये दोन्ही पक्षाची वाताहात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 04:25 PM2024-11-29T16:25:09+5:302024-11-29T16:25:37+5:30

आता उभारी कशी घेणार? उद्धवसेना आणि शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांना याबाबत विचारणा करताच त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये आणखी ताकदीने काम करू, असे सांगितले.

the Uddhav Sena candidate lost, and the Shindesena has no candidate; In Beed, both parties struggles for prasence | उद्धवसेनेचा उमेदवार पडला, तर शिंदेसेनेला उमेदवारीच नाही; बीडमध्ये दोन्ही पक्षाची वाताहात

उद्धवसेनेचा उमेदवार पडला, तर शिंदेसेनेला उमेदवारीच नाही; बीडमध्ये दोन्ही पक्षाची वाताहात

बीड : जिल्ह्यात सध्या उद्धवसेना आणि शिंदेसेना यांची वाताहात पहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत बीडची हक्काची जागा महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेली. त्यामुळे शिंदेसेनेचा पहिल्यांदाच विधानसभेतील उमेदवारीचा आकडा शून्य झाला. तर उद्धवसेनेने बीडच्या बदल्यात गेवराईची जागा घेतली; परंतु तेथेही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता यातून शिवसेनेचे दोन्ही गट यातून कशी उभारी घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात परळी, बीड, आष्टी, केज, माजलगाव आणि गेवराई असे सहा मतदारसंघ आहेत. आतापर्यंत महायुतीत असताना बीड मतदारसंघाची जागा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडे असायची. यावेळीही शिंदेसेनेने या जागेवर दावा केला होता. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यासाठी इच्छुक होते. परंतु, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीत फूट पडायच्या आगोदर बीडमध्ये राष्ट्रवादीचा आमदार असल्याने या जागेवर अजित पवार गटाने दावा केला होता. त्यामुळे शिंदेसेना आणि अजित पवार गट यांच्यात साधारण महिनाभर उमेदवारीवरून खलबते चालली. इच्छुकांच्याही मुंबईवाऱ्या झाल्या. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पहाटेच्या सुमारास बीडची जागा अजित पवार गटाला गेली आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे नाराज जगताप यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यात जगताप आणि डॉ. योगेश या दोघांचाही पराभव झाला.

दुसऱ्या बाजूला मविआत उद्धवसेनेने बीडच्या बदल्यात गेवराईची जागा घेतली. येथे माजी मंत्री बदामराव पंडित यांना उमेदवारी दिली. परंतु पाच वर्षे मतदारसंघातील तुटलेला संपर्क यामुळे त्यांचा पुतण्या विजयसिंह पंडित यांनी त्यांचा ४२ हजार मतांनी पराभव केला. सध्या तरी बीड जिल्ह्यात शिवसेनेची वाताहात झाल्याचे पहायला मिळत आहे.

संदीप क्षीरसागरांमुळे भोपळा टळला
जिल्ह्यात महाविकास आघाडीत शरद पवार गटाचे पाच, तर ठाकरे गटाचे एका ठिकाणी उमेदवार होते. परळी, आष्टी, केज, माजलगाव या ठिकाणच्या उमेदवारांचा पराभव झाला. बीडमध्येही संदीप क्षीरसागर यांचा ५ हजार मतांनी निसटता पराभव झाला. बीड शहरातून मिळालेले मताधिक्यच त्यांच्या विजयासाठी निर्णायक राहिले. संदीप यांच्यामुळे शरद पवार गट आणि मविआचा भोपळा टळला.

स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा दावा
उद्धवसेना आणि शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांना याबाबत विचारणा करताच त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये आणखी ताकदीने काम करू, असे सांगितले. तसेच दोघांनीही सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेऊ असा दावा केला आहे. परंतु त्या आगोदर विधानसभेतील पराभव आणि उमेदवारी न मिळण्याची कारणे शोधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. विधानसभामधील चुकांची आगामी निवडणुकांमध्ये पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊ, असेही जिल्हाप्रमुखांनी सांगितले.

आगामी निवडणुकांमध्ये ताकदीने उतरू
जिल्ह्यात आमची शिवसेना मजबूत होती आणि आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा केल्यानेच शिवसेना आणि महाविकास आघाडीचा पराभव झालेला आहे. भाजप आणि महायुतीने हिंमत असेल तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात. आम्ही ईव्हीएमविरोधात मोठे आंदोलन उभे करणार आहोत. आगामी निवडणुकांमध्ये आम्ही ताकदीने उतरून सर्व संस्था उद्धवसेना आणि मविआच्या ताब्यात आणल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आम्ही सर्व मिळून काम करू.
- गणेश वरेकर, जिल्हाप्रमुख उद्धवसेना, बीड

चित्र बदलून दाखवू
एकनाथ शिंदे यांनी धुरा हातात घेतल्यापासून शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्यक्षात विकासकामेही झाली. विधानसभेत बीडची हक्काची जागा महायुतीत राष्ट्रवादीला गेली, हे खरे आहे. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हे चित्र बदलून दाखवू. आमचे शिवसैनिक महायुतीत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करतील. महायुतीत सर्व मिळून काम करू. ईव्हीएमवर संशय घेणाऱ्यांनी लोकसभेचाही अभ्यास करावा. बिनबुडाचे आरोप करू नये.
- सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख शिंदेसेना, बीड

Web Title: the Uddhav Sena candidate lost, and the Shindesena has no candidate; In Beed, both parties struggles for prasence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.