पुतण्याला पुढे करत चुलत्याने मिळविली उमेदवारी; नको नको म्हणणारे प्रकाश सोळंके पुन्हा मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 07:08 PM2024-10-24T19:08:25+5:302024-10-24T19:09:11+5:30

मागील विधानसभा निवडणुकीत प्रकाश सोळंके यांनी मतदारसंघात प्रत्येक सभेदरम्यान ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत निवडून देण्याचे भावनिक आवाहन करत विजय मिळवला होता.

The Uncle won the nomination ahead of the nephew; Prakash Solanke, who says no, is back in the Vidhansabha field | पुतण्याला पुढे करत चुलत्याने मिळविली उमेदवारी; नको नको म्हणणारे प्रकाश सोळंके पुन्हा मैदानात

पुतण्याला पुढे करत चुलत्याने मिळविली उमेदवारी; नको नको म्हणणारे प्रकाश सोळंके पुन्हा मैदानात

- पुरुषोत्तम करवा
माजलगाव :
दोन महिन्यांपूर्वी येथील आमदार प्रकाश सोळंके यांनी ‘मी ही निवडणूक लढविणार नसून, माझा पुतण्या जयसिंह सोळंके यांना सहकार्य करा’, असे आवाहन अनेक सभेत केले होते. पुतण्याचे नाव पुढे करत स्वतःच तिकीट मागत त्यांनी उमेदवारी पदरात पाडून घेतली. यामुळे माजलगाव मतदारसंघात पुतण्यावर चुलता भारी ठरल्याची चर्चा होत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे रमेश आडसकर यांच्या उमेदवारीमुळे विजय मिळवणे जड जात होते. त्यामुळे प्रकाश सोळंके यांनी मतदारसंघात प्रत्येक सभेदरम्यान ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत निवडून देण्याचे भावनिक आवाहन केले होते. यामुळे सोळंके यांना सहानुभूती मिळाली होती. तरीही नवखे रमेश आडसकर यांनी चांगली लढत दिली. केवळ ११ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. पराभवानंतरही गत पाच वर्षांत एकही दिवस मतदारसंघ सोडला नाही व कायम जनतेच्या संपर्कात राहिले.

सात-आठ महिन्यापूर्वी मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाच्या विरोधात आ. प्रकाश सोळंके यांनी अपशब्द वापरल्यामुळे मराठा युवकांनी त्यांचे संपूर्ण घर जाळून टाकले होते. मराठा समाज आपल्या विरोधात आहे व पुतण्या जयसिंह सोळंके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली होती. ही गोष्ट कानावर पडताच प्रकाश सोळंके यांनी त्यांचा पुतण्या जयसिंह सोळंके यांचे नाव पुढे करत मराठा समाजामधून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. पुतणे जयसिंह सोळंके यांनीही संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ जयसिंह सोळंके यांनीच मागणी केल्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु, प्रकाश साेळंके यांनी पुतण्याऐवजी स्वतःसाठी उमेदवारी मिळवली. पुतण्याने इकडे तिकडे उमेदवारी मागितल्यास आपली अडचण होईल. यामुळे दोन महिन्यांपासून जयसिंग सोळंके यांचे नाव पुढे करत त्यांना चांगलेच झुलवत ठेवल्याचे दिसले. चुलत्याकडूनच धोका मिळाल्यामुळे यापुढे जयसिंह सोळंके काय निर्णय घेतात, याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

चेअरमन पदाचे गाजर देणार?
एक वर्षापूर्वी तेलगाव येथील सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चेअरमन पदावर हक्क सांगणारे जयसिंह यांना प्रकाश सोळंके यांनी विधानसभा लढवण्याचे गाजर दाखवत व्हाइस चेअरमन केले व स्वतःच्या मुलाला चेअरमन केले होते. तिकीट न मिळाल्यामुळे सध्या नाराज असलेले जयसिंह सोळंके यांना या कारखान्याचे चेअरमनपद देऊन त्यांना शांत केले जाऊ शकते, असे राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत. त्यामुळे नाराज जयसिंह सोळंके हे अपक्ष निवडणूक लढवत चुलत्याला पाडण्यासाठी पुढे येतात की, चेअरमनपद मिळवितात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The Uncle won the nomination ahead of the nephew; Prakash Solanke, who says no, is back in the Vidhansabha field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.