रखडलेल्या रस्त्याचा बळी; नाल्यात कार कोसळून चालकाचा मृत्यू, कुटुंबाचा एकमेव आधार हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 04:15 PM2022-02-22T16:15:32+5:302022-02-22T16:15:59+5:30

रखडलेल्या महामार्गावर समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना त्याची कार रस्त्याच्या खाली उतरली

The victim of a stray road; The car crashed into the nala and driver died, familyls single support lost | रखडलेल्या रस्त्याचा बळी; नाल्यात कार कोसळून चालकाचा मृत्यू, कुटुंबाचा एकमेव आधार हिरावला

रखडलेल्या रस्त्याचा बळी; नाल्यात कार कोसळून चालकाचा मृत्यू, कुटुंबाचा एकमेव आधार हिरावला

Next

अंबाजोगाई - शहरातून गेलेल्या राष्ट्रीय मार्गाच्या कामास होणारा विलंब नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. सोमवारी (दि.२१) रात्री १२ वाजता यशवंतराव चव्हाण चौकात पाण्याच्या टाकीजवळ महामार्गाच्या लगत अर्धवट काम सोडलेल्या नालीत कार कोसळून २२ वर्षीय तरूण चालक ठार झाला. चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या महामार्गाचे अधिकारी आणि गुत्तेदार यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संतप्त नागरीकातून होत आहे. 

निलेश मधुकर पवार (वय २२, रा. मोरेवाडी, अंबाजोगाई) असे त्या मृत चालकाचे नाव आहे. कार भाड्याने देण्याचा निलेशचा व्यवसाय होता. सोमवारी रात्री तो कारमध्ये डीझेल भरून यशवंतराव चव्हाण चौकाकडून घराकडे निघाला होता. तो पाण्याच्या टाकीजवळ आला असता रखडलेल्या महामार्गावर समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना त्याची कार रस्त्याच्या खाली उतरली आणि अर्धवट बांधून लोखंडी गज उघडे सोडलेल्या नालीत कोसळली. या अपघातात निलेश गंभीर जखमी झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. 

पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर
निलेश हा माता-पित्याला एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. निलेश हा घरातील कर्ता तरुण पुरुष असल्याने त्याच्यावरच कुटुंबाचा भार होता. त्याच्या अपघाती मृत्यूने या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. 

अधिकारी, गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे अपघातांची मालिका
चार वर्षापासून अंबाजोगाईच्या आजूबाजूला विविध महामार्गांची कामे सुरु आहेत. अतिशय संथ गतीने ही कामे सुरु असून या कामांची मूळ मुदत केंव्हाच संपली आहे. यापूर्वी पिंपळा- धायगुडा ते अंबाजोगाई या रखडलेल्या कामाने अनेकांचे बळी घेतले. अजूनही हा मार्ग पूर्ण झालेला नाही. हीच गत आता भगवानबाबा चौक ते पाण्याची टाकी पर्यंतच्या रस्त्याची आहे. अनेक निवेदने, आंदोलने केल्यानंतरही गेंड्याची कातडी असलेल्या महामार्गाच्या गुत्तेदाराला आणि अधिकाऱ्यांना काहीच फरक पडला नाही. आमच्या मनात येईल तेंव्हा आणि तेवढेच काम करू अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसते. अर्धवट कामे करून उर्वरित सामान तसेच सोडले जाते, अनेक ठिकाणी नाल्या आणि गज उघडे आहेत. परिणामी, अपघात आणि निष्पाप नागरिकांच्या बळीची मालिका सुरूच आहे. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यावर या मुर्दाड अधिकाऱ्यांचे समाधान होणार? असा संतप्त सवाल नागरीकातून केला जात आहे. तर, तिकडे बर्दापूर ते अंबासाखर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग अरुंद असल्यामुळे मृत्यूचा सापळा बनला असून तिथे अपघातसत्र सुरूच आहे.

अधिकारी, गुत्तेदारावर गुन्हे दाखल करा
रखडलेल्या कामाचा परिसरातील नागरिकांना, व्यापाऱ्यांना आणि वाहनधारकांना प्रचंड त्रास आहे. धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे, तर खराब रस्त्यामुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जात आहे. याला कारणीभूत असलेला गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
-राजेश वाहुळे

Web Title: The victim of a stray road; The car crashed into the nala and driver died, familyls single support lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.