प्रतीक्षा संपली; बीड पोलिस उभारणार नवीन घरात गुढी, २४१ घरांचे काम पूर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 11:25 IST2025-03-18T11:24:26+5:302025-03-18T11:25:42+5:30
आठवडाभरात घरे वाटपाला होणार सुरुवात

प्रतीक्षा संपली; बीड पोलिस उभारणार नवीन घरात गुढी, २४१ घरांचे काम पूर्ण!
बीड : मुख्यालयासह बीड उपविभागातील २४१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता नवीन घरात जायला मिळणार आहे. पाेलिस मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या टोलेजंग इमारतींची कामे पूर्ण झाली असून ३० मार्च रोजी पाडव्याच्या दिवशी नवीन घरातच पोलिस दादा, ताई हे गुढी उभारणार आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या बाजूसह इतर ठिकाणची पोलिसांची निवासस्थाने मोडकळीस आल्याने राहण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना किरायाच्या घरात राहावे लागत होते. हाच धागा पकडून २०१९ साली पोलिसांसाठी निवासस्थाने मंजूर झाली. पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळांतर्गत ६० कोटींची निविदा निघाली. पुण्याच्या धनश्री बिल्डकॉन यांनी ती ५२ कोटी रुपयांमध्ये घेतली. हे काम २०२२ मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु कोरोनाचे कारण देत कंत्राटदाराने याला उशीर केला. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला दंडही ठोठावला. अखेर या घरांचे काम आता पूर्ण झाले असून, गुढीपाडव्याआधीच सर्वांना नवीन घरात राहायला मिळणार आहे.
विजेसह इतर कामे पूर्ण
जानेवारी महिन्यातच ही सर्व घरे मिळणे अपेक्षित होते. परंतु, विजेचा प्रश्न मिटला नव्हता. तसेच इतर अंतर्गत कामेही अपूर्ण होती. त्यामुळेच दोन महिने उशीर झाला. आता सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे नवीन घरात राहायला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यालयासह एक इमारत ताब्यात
पोलिस मुख्यालयाची इमारत यापूर्वीच ताब्यात घेतली आहे. तर कर्मचाऱ्यांना राहण्यासाठीची ४२ घरांची एक पाच मजली इमारतही ताब्यात घेतली आहे. दोन दिवसांत घरे वाटप होतील. इतर इमरातीमध्येही आठवडाभरात घरे वाटपाचे काम हाती घेतले जाणार आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनीही याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत गृहचे उपअधीक्षक उमाकांत कस्तुरे, गृह निर्माण विभागाचे कनिष्ठ अभियंता के. पी. देशमुख, कार्यालयीन अधीक्षक नरसिंह कासेवाड, लिपिक विष्णू काकडे आदी होते.
कोणासाठी किती घरे?
टाइप-२ मध्ये एकूण पाच इमारती आहेत. प्रत्येक इमारत सात मजली असून एका इमारतीत २ बीएचके ४२ अशी २१० घरे आहेत. हे सर्व कर्मचाऱ्यांसाठी असतील. टाइप- ३ मध्ये १ इमारत असून २ बीएचके २८ घरे आहेत. ती अधिकाऱ्यांसाठी असतील. टाइप- ४ मध्ये ३ बीएचके अशी तीन घरे असतील. ते सर्व उपअधीक्षक यांच्यासाठी असतील. सर्वच इमारतींमध्ये लिफ्टची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पोलिस मुख्यालयाची इमारतही तयार झाली आहे. ज्यात राखीव पोलिस निरीक्षक कक्ष, शस्त्रागृह, शस्त्र दुरुस्ती गृह आदींचा समावेश आहे.
पाठपुरावा सुरू
निवासस्थानांसह इतर इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. मुख्यालय व टाइप-२ मधील एक इमारत ताब्यात घेतली आहे. इतरही ताब्यात घेऊन आठवडाभरात सर्व घरे वाटप केले जातील. आमचा पाठपुरावा सुरूच आहे.
-नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड