गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सूतगिरणीत चोरी; साडेपाच लाख रुपयांचे विद्युत साहित्य चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 05:07 PM2022-12-30T17:07:32+5:302022-12-30T17:08:26+5:30
विद्युत प्रवाह बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी ट्रान्सफर्मरमधील कॉपरचे साहित्य लंपास केले
- मधुकर सिरसट
केज (बीड) : तालुक्यातील लव्हुरी शिवारातील लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सुतगिरणीमध्ये चोरीची घटना बुधवारी २८ डिसेंबर रोजी उघडकीस आली. येथे स्वखर्चातून बसविलेल्या विद्युत ट्रान्सफर्मरमधील कॉपरचे 5 लाख 60 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.
लव्हूरी शिवारात माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सतगिरणी उभारणीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. येथे विद्युत पुरवठा करण्यासाठी इस्लामपूर ( जि. सांगली) येथून पॉवर ट्रान्सफर्मर व इतर साहित्य सुतगिरणीने स्वखर्चातून खरेदी केले. हे साहित्य डिसेंबर २०२१ दरम्यान सूतगिरणीच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूला ईलेक्ट्रीक विभागात बसवले होते. सध्या या ट्रान्सफार्मरला विद्युत प्रवाहाची जोडणी केलेली नाही. दरम्यान, ७ डिसेंबर २०२२ रोजी कार्यकारी संचालक अनिल पाखरे व लेखाधिकारी विठ्ठल मुळे यांच्या तपासणीत साहित्य सुस्थितीत होते.
दरम्यान, विद्युत प्रवाह बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी ट्रान्सफर्मरमधील 6 कॉपर कॉइल्स, 800 किलो वजनाचे एपीएफसी पॅनलमधील कॉपर साहित्य व केबल असे 5 लाख 60 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. बुधवारी 28 डिसेंबर रोजी साहित्य चोरीस गेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी लेखाधिकारी विठ्ठल मुळे यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात आज गुन्हा नोंद झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार उमेश आघाव हे पुढील तपास करीत आहेत.