...तर वाढदिवसालाच खावी लागेल जेलची हवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:36 AM2021-09-18T04:36:40+5:302021-09-18T04:36:40+5:30
बीड: भर रस्त्यात हुल्लडबाजी करत धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करणे महागात पडू शकते. वाढदिवसाच्या दिवशीच बर्थ डे ...
बीड: भर रस्त्यात हुल्लडबाजी करत धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करणे महागात पडू शकते. वाढदिवसाच्या दिवशीच बर्थ डे बॉयवर जेलची हवा खाण्याची वेळ ओढावू शकते. त्यामुळे नियमभंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
जिल्ह्यातील तरुणाईत बर्थ डे सेलिब्रेशनचे भलते फॅड आहे. त्यासाठी मध्यरात्री भर रस्त्यात गर्दी जमवून सत्कार, तोफा, फटाक्यांची आतषबाजी आणि काही वेळा मोठमोठ्या आवाजात नाचगाणेही होतात.
आण्णा, भाऊ, भैय्या, दादा अशा नावांनी गल्लीबोळातील तरुण कार्यकर्त्यांचे लॉंचिंग करण्यासाठी वाढदिवसाचा मुहूर्त शोधला जातो. मात्र, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून आता पोलीस खरबदारी घेणार आहेत.
....
रस्त्यावर वाढदिवस कारणाऱ्यांवर कारवाई
वर्ष कारवाईची संख्या
२०१९ ०८
२०२० ०६
२०२१ ०२
....
यामुळे होऊ शकतो गुन्हा दाखल
भरस्त्यात वाहन उभे करुन केक कापणे
केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करणे
डीजे लावून रस्त्यावर नाचगाणे करणे
मध्यरात्री फटाके फाेडणे
कोविड नियमांचे पालन न करता गर्दी जमविणे
बेकायदेशीर शस्त्र बाळगून वाढदिवसाचे फोटोसेशल करणे
....
रात्री-अपरात्री फटाके फोडून वाढदिवस साजरा करण्याचे तसेच रस्त्यावर एकत्रित येऊन केक कापून गोंधळ घालणाऱ्यांबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाते. गस्तीदरम्यान देखील असा काही प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. यातून कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठाणेप्रमुखांना सूचना दिल्या आहेत.
- सुनील लांजेवार, अपर अधीक्षक, बीड.