...तर नरभक्षक बिबट्यास ठार मारण्याची परवानगी घेऊ - धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 03:18 PM2020-11-28T15:18:27+5:302020-11-28T15:19:55+5:30
Leopard Attack, Dhananjay Munde : नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी राज्यातील सर्व टीम आष्टीत पाचारण करणार
कडा ( बीड ) : सुर्डी, किन्ही येथे दोघांच्या नरडीचा घोट घेतलेला बिबट्या अद्यापही हाती लागत नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी औरंगाबाद, अमरावती, पुणे, जुन्नर, नगर, बीड येथील टीम तळ ठोकून आहेत. आता राज्यातील सर्व टीम नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी आष्टीत पाचारण करणार आहे. त्यातही यश मिळाले नाही तर वन्यजीव विभागाची परवानगी घेऊन बिबट्याला शुटरच्या माध्यमातून ठार मारण्याची परवानगी घेणार असल्याचे पालकमंत्री ना.धनजंय मुंडे स्पष्ट केले.
आष्टी तालुक्यातील सुर्डी व किन्ही येथील बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोघाचा जिव गेला. त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे शनिवारी आष्टी तालुक्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. मी यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगाबाद, नागपुर येथील अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. या टीमला यश आले नाही तर रात्रीतुन राज्यातील सर्व टीमला आष्टीत पाचारण करण्यात येईल. शेवटी वन्यजीव विभागाची परवानगी घेऊन शुटरच्या माध्यमातून बिबट्याला ठार करण्यात येईल. याबाबतच्या परवानगीसाठी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी माझे बोलणे झाले आहे, अशी माहिती पालकमंत्री मुंडे यांनी दिली. तसेच ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले.
गर्जे, भापकर कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले
यावेळी त्यांनी सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गर्जॅ व स्वराज भापकर याच्या कुटुंबियांचे पालकत्व सर्व ग्रामस्थांसमोर स्विकारले. स्वराज भापकर याच्या कुटुंबालासुद्धा शासनाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांचा धनादेश व दहा लाखांची एफडीची मदत देण्यात येईल असेही पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकर, बजरंग सोनवणे, रामकृष्ण बांगर, सतिश शिंदे, आदि उपस्थित होते.