...तर खाजगी बस दरीत कोसळली असती; चालकासह ३६ प्रवासी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 03:35 PM2020-02-18T15:35:43+5:302020-02-18T15:38:43+5:30
तुटलेल्या कठड्याच्या बाजूने ट्रकला साईड देताना बसची लोखंडी ग्रीलला धडक बसली.
धारूर (जि. बीड) : ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ या म्हणीचा प्रत्यय रविवारी रात्री धारूर घाटात प्रवाशांना अनुभवास आला. समोरून आलेल्या उसाच्या ट्रकला साईड देताना कठडा तुटलेल्या ठिकाणी धाडकन आवाज होत खाजगी बसचे समोरील चाक कठड्यालगत आधार झाले. या वेळी मागील चाक कठड्याला अडकल्याने मोठा अपघात टळला असून ३६ प्रवासी असलेली खाजगी बस ३०० फूट दरीत कोसळताना वाचली.
रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास लातूरहून -औरंगाबादकडे(क्र. एम .एच.०४ एफ .के-१८०) ही चालकासह ३६ प्रवासी असलेली खाजगी बस धारूर येथील घाटातून जात होती. या वेळी उंचावरील वळणाच्या ठिकाणी बस आल्यानंतर समोरून उसाचा ट्रक आला. या वेळी तुटलेल्या कठड्याच्या बाजूने ट्रकला साईड देताना बसची लोखंडी ग्रीलला धडक बसली. त्यामुळे मोठा अवाज होताच चालकाने ब्रेक दाबले. या वेळी ग्रील वाकून बसचे चाक कठडा सोडून दरीकडे आले. या वेळी मागील चाक कठड्याला अडकल्याने बस जागीच थांबली. जर बस दोन फूट पुढे आली असती तर ती थेट ३०० फूट दरीत कोसळली असती. सुदैवाने मोठा अपघात टळला. या घटनेनंतरही प्रसंगावधान राखत चालकाने प्रवाशांना दुसऱ्या बाजूने दरवाजा उघडून बाहेर काढले.