‘घरात लहान लेकरं आहेत हो, जनावरे उपाशी राहतील, आम्हाला कोरोना रुग्णालयातून घरी सोडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 06:35 PM2020-10-31T18:35:18+5:302020-10-31T18:38:21+5:30
उपचार पूर्ण होण्याआधीच रुग्णालयातून घरी जाण्याची घाई
- सोमनाथ खताळ
बीड : कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून उपचार पूर्ण होण्यापूर्वीच रुग्णालयातून सुटी घेण्यासाठी विविध कारणे आणि अडचणी सांगत असल्याचे समोर आले आहे. कोणी घरात लहान लेकरं असल्याचे सांगतात तर कोणी शेतात जनावरे उपाशी राहतील, असे सांगून रुग्णालयातून पळ वाट काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १३ हजारांच्या पुढे गेली आहे. यातील किमान ४० टक्के पेक्षा जास्त लोकांना जास्त लक्षणे जाणवत नाहीत. रुग्णालय अथवा कोवीड केअर सेंटरमध्ये दोन दिवस मुक्काम केला की त्यांच्याकडून कारणे सांगून सुटी देण्यासाठी विनवणी केली जाते. तसेच इकडे नातेवाईकही अधिकारी, डॉक्टरांना कारणे सांगतात. परंतू नियमाप्रमाणे १० दिवस उपचार पूर्ण करूनच रुग्णाला सुटी दिली जाते. परंतू त्यापूर्वीच सुटी मिळावी, म्हणून मजेशीर कारणे सांगितले जाताहेत.
डिस्चार्जसाठी कोणती कारणे सांगितली जातात?
- मी पॉझिटिव्ह असून माझी लहान मुले निगेटिव्ह आहेत, त्यांना सांभाळायला कोणीच नाही. मला काहीच लक्षणे नाहीत. त्यामुळे येथून घरी जाऊद्या. मी घरी राहुन क्वारंटाईन राहते. मला माझ्या मुलांची काळजी घेण्यासाठी जाऊद्या, अशी विनवणी महिला करतात.
- मला काहीच लक्षणे नाहीत. मला कोवीड केअर सेंटरला ठेवण्यापेक्षा मी घरी राहतो. आमच्या घरी स्वतंत्र खोली असून मी सर्व नियमांचे पालन करीन. फक्त मला या रुग्णालयातून आणि सेंटरमधून सोडा, असेही सांगतात.
- शेतकऱ्यांच्या अडचणी जास्त आहेत. पॉझिटिव्ह आल्यानंतर शेतातील कामे रखडली आहेत. जनावरांचा प्रश्न आहे, असे म्हणत सुटी मागितली जाते.
- आम्हाला करमत नाही. इथे थांबण्यापेक्षा घरी राहूत. कसलेही लक्षणे आणि त्रास नसतानाही, इथे कोंडून ठेवले आहे. आमच्या घरी अडचणी आहेत. आम्हाला कुटूंबाकडे जायचे आहे, असेही बाधित म्हणतात.
- आमच्या रुग्णाला त्रास नाही. त्यामुळे त्याला घरी सोडा. इथे राहुन त्याला आणखीन संसर्ग होईल. इथे राहुन मानसिकता बिघडत आहे. त्यामुळे आमच्या रुग्णाला घरी सोडा, असे नातेवाईक म्हणतात.
१० दिवस उपचार करून नंतर सोडले जाते घरी
एखादा रुग्ण बाधित आढळला की त्याच्यावर लक्षणे असतील तर रुग्यालयात आणि नसतील तर कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार केले जातात. १० दिवसात काहीच त्रास नाही जाणवल्यास ११ व्या दिवशी सुटी केली जाते. आणखी पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सुचनेसह औषधीही सोबत दिली जातात. आहार व्यवस्थित ठेवण्यासह काळजी घेण्याबाबत सांगितले जाते. कुटूंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात येऊ नये, असेही सांगितले जाते.
नियमाप्रमाणेच सुटी
रुग्ण बाधित आढळल्या नंतर १० दिवस त्याच्यावर उपचार केले जाता. लक्षणे नसतील तर त्याला डिस्चार्ज दिला जातो. लक्षणे असतील तर पूर्णपणे बरा होईपर्यंत रुग्णालयातच ठेवले जाते. रुग्ण, नातेवाईक कारणे सांगत असले तरी नियमाप्रमाणेच सुटी देतोत.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड