१००, १०, पाच रुपयांच्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेचे आदेशच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:30 AM2021-02-05T08:30:09+5:302021-02-05T08:30:09+5:30
बीड : रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या महाव्यवस्थापकांनी १००, १० आणि पाच रुपयांच्या जुन्या मालिकेतील नोटा मार्च -एप्रिलनंतर बंद ...
बीड : रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या महाव्यवस्थापकांनी १००, १० आणि पाच रुपयांच्या जुन्या मालिकेतील नोटा मार्च -एप्रिलनंतर बंद होणार असल्याचे संकेत दिल्यानंतर मागील तीन दिवसात या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये कुठलीही गर्दी दिसून आली नाही. उलट बाजारात सर्वत्र नेहमीप्रमाणे या नोटांचे व्यवहार सुरळीतपणे सुरू होते.
सोमवारी काही बँकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्याचा हेतूने मोजके ग्राहक आले होते. हे प्रमाण मात्र अत्यंत कमी होते.
महाव्यवस्थापक बी. महेश यांनी एका कार्यक्रमात हे सूचक संकेत दिल्यानंतर शनिवारपासून चर्चेला उधाण आले. मात्र सोमवारपर्यंत बँकांना कोणतेही आदेश आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर देण्यात आलेल्या स्पष्टीकरणात तीन ते चार महिन्यांचा अवधी असल्याने जुन्या नोटांबाबत लोक अजूनही फारशा प्रतिक्रिया व्यक्त करत नसून बिनधास्त व्यवहार करत आहेत.
पाच वर्पांपूर्वी एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर त्या बदलण्यासाठी जनतेला अनेक दिवस त्रास सोसावा लागला होता. सध्या पाच-दहा आणि शंभर रुपयांच्या जुन्या नोटांमुळे कुठलीही समस्या उद्भवलेली नाही. केवळ या नोटा जीर्ण झालेल्या आहेत. पिग्मी तसेच किरकोळ खरेदी- विक्रीसाठी या नोटांचा वापर विनातक्रार होत आहे. १००, १० आणि पाच रुपयांच्या जुन्या मालिकेतील नोटा बंद करावयाच्या असतील तर तीन-चार महिने आधी त्याची कल्पना देऊन टप्प्याटप्प्याने या नोटा बंद करणे उचित ठरेल, असे सामान्य व्यापारी बोलतात.
अद्याप आदेश नाहीत.
जुन्या १००, १० आणि पाच रुपयांच्या नोटाबाबत अद्याप कुठलेही लेखी आदेश अग्रणी बँकांना मिळालेले नाही. बँकांमार्फतही या नोटांचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत. जेव्हा रिझर्व्ह बँकेचे अधिकृत आदेश येतील तेव्हा त्याबाबतच्या सूचना बँकांना देण्यात येतील. - श्रीधर कदम, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, बीड
----------
स्पष्टीकरण हवे
जुन्या मालिकेतील १००, १० आणि पाच रुपयांच्या नोटा व्यवहारात आहेत. तसेच १०० व ५० रूपयांच्या नवीन नोटाही भरपूर आहेत. बँकांकडून नव्या नोटांचे वितरण होते, मात्र त्या तुलनेने परत जमा होण्याचे प्रमाण की आहे. जुन्या मालिकेतील अत्यंत जीर्ण, खराब नोटा सॉईल करून बँकेत ठेवल्या जातात. यातच कोणत्या मालिकेतील नोटा बंद होणार व कोणत्या नोटा व्यवहारात राहणार तसेच खरोखर या नोटा बंद होणार काय? याबाबत स्पष्टीकरण नसल्याने या संकेतांचा कोणताही परिणाम अद्याप दिसून आलेला नाही.
-------
ग्राहक पाच रुपयांची नोट घेत नाहीत. दहा रुपयांचे नाणेही घेत नाहीत. त्यांची नाणी मात्र व्यापारी, हॉटेलवर स्वीकारली जातात. या नोटा रद्द करावयाच्या असतील तर बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून पुरेसा अवधी मिळाला पाहिजे- असीम अहमद, हॉटेल चालक
------
जुन्या, नव्या १००, १० व पाच रुपयांचे व्यवहार सुरळीत आहेत. छोटे विक्रेते, भाजी विक्रेते, फिरते विक्रेत्यांकडे या नोटांचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होतो. जर या नोटा रद्द करायच्या असतील तर त्या विनाअट बँकेने स्वीकारल्या पाहिजेत. - भरत पडधरिया, व्यापारी, बीड
-----
जुन्या मालिकेतील १००, १० रुपयांच्या नोटा जीर्ण झाल्या आहेत. या बंद होणार असतील तर चांगले आहे. पाच रुपयांच्या नोटांवरून ग्राहक, व्यापाऱ्यात वादही होतात. या नोटांसोबतच जुन्या मालिकेतील ५० रुपयांच्या नोटा बंद करून नव्या नोटांचा पुरेसा पुरवठा आवश्यक आहे. - अनिल गुप्ता, व्यापारी, बीड