दुष्काळाने शेतातून उत्पन्न नाही, कर्ज कसे फिटणार? विवंचनेत तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 06:34 PM2023-12-19T18:34:06+5:302023-12-19T18:34:54+5:30
दुष्काळ, अवकाळी पावसामुळे हातातोडाशी आलेले उत्नन्न गेले
धारूर (बीड): तालुक्यातील आरणवाडी येथील ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. अर्जुन उद्धव माने असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
अर्जुन माने यांच्याकडे खाजगी सावकारासह महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ३ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज होते. धारूर तालुक्यात पडलेला दुष्काळ, अवकाळी पावसामुळे हातातोडाशी आलेले उत्नन्न गेल्यामुळे मागील काही दिवसांपासून कर्ज फेडण्याच्या विवंचनेत होते. या तणावातून त्यांनी सोमवारी सायंकाळी शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जिवनयात्रा संपवली. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी आरणावाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडिल, भाऊ, बहिण असा परिवार आहे. या प्रकरणी धारुर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.