घाटनांदूर येथे ब्रेकर नसल्याने विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:32 AM2021-04-25T04:32:56+5:302021-04-25T04:32:56+5:30
घाटनांदूर : येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा दिवसभरात किमान ३० ते ४० वेळा वारंवार खंडित होत ...
घाटनांदूर : येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा दिवसभरात किमान ३० ते ४० वेळा वारंवार खंडित होत असल्याने वीज उपकरणांची वाट लागत असून लॉकडाऊनमुळे घरात राहणारांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. वेगवेगळ्या फिडरला (ब्रेकअप) कामानिमित्त बंद करण्यासाठी असणारे ब्रेकर उपलब्ध नसल्याने विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. हा प्रकार तब्बल तीन महिन्यांपासून सुरू असून यामुळे दाब वाढून येथील पॉवर ट्रान्सफॉर्मर जळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
येथील उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. येथून तीन फिडरद्वारे वीजपुरवठा केला जातो. तळणी, पूस, गिरवली, हातोला व घाटनांदूर फिडरद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. या ठिकाणी वीजपुरवठ्यासाठी एकच पॉवर ट्रान्सफाॅर्मर असल्याने सतत लोड येऊन वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे लोडशेडिंग करण्यात येते. या ठिकाणी गावठाण फिडर नसल्याने वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय येतो आहे. त्यातच गत तीन महिन्यांपासून ब्रेकर उपलब्ध नाही. काही कामानिमित्त वेगवेगळ्या फिडरवर काही काम निघाले, तर ते एकच फिडर बंद करण्यासाठी ब्रेकरचा उपयोग होतो. ब्रेकर उपलब्ध नसल्याने सर्वच फिडर कामासाठी एकदाच बंद करावे लागत आहेत. एकमेव असलेल्या पॉवर ट्रान्सफाॅर्मरवर ब्रेकर नसल्याने सतत लोड येत असून पाचपाच मिनिटाला वीज ट्रिप होते आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता जाणवत आहे. त्यात कोरोनाचा कहर, लॉकडाऊनमुळे घरात बसण्याला नागरिक प्राधान्य देत असले, तरीही खंडित वीजपुरवठ्यामुळे व्यत्यय येत असून वारंवार विजेच्या लपंडावामुळे विद्युत उपकरणांची वाट लागत आहे. कोरोनाचे अनेक रुग्ण घरातच विलगीकरण करून ठेवले आहेत. अशा रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विजेचा लपंडाव वीज वितरण कंपनीच्याही अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण, ब्रेकर नसल्याने पॉवर ट्रान्सफाॅर्मरवर लोड येत असून तो केव्हाही फेल किंवा जळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वीज वितरण कंपनीने फक्त वसुलीच न पाहता वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करून वीजग्राहकांना दिलासा द्यावा. गावठाण फिडर तत्काळ उभे करून ते कार्यान्वित केल्यास विजेबाबतच्या अडचणी दूर होऊ शकतात. - मंगेश वालेकर, अध्यक्ष जय मल्हार सामाजिक संघटना, घाटनांदूर
ब्रेकरबाबत वरिष्ठांना सूचना देऊन पत्रव्यवहार केला आहे. तसेच गावठाण फिडरसंदर्भात प्रस्ताव दाखल केला असून लवकरच मार्गी लागेल. - सचिन बागेश्वर, सहायक अभियंता
ब्रेकर खराब झाले आहेत. नवीन ब्रेकर बसविण्यासाठी कंत्राटदाराला ऑर्डर दिली असून येत्या दोन दिवसांत ते ब्रेकर बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल. गावठाण फिडर उभारण्यास रेल्वेलाइन आडवी येत आहे. त्यावरही तोडगा काढण्याचे काम सुरू आहे. - संजय देशपांडे, उपकार्यकारी अभियंता, अंबाजोगाई विभाग