भत्ता द्यायला निधीच नाही; ४०० होमगार्डची सेवा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:15 AM2020-01-12T00:15:36+5:302020-01-12T00:16:16+5:30
दोबस्त वा गरजेच्या वेळी पोलिसांना मदत म्हणून नियुक्त गृहरक्षक दलाचे जिल्ह्यातील ४०० जवानांची सेवा स्थगित करण्यात आली आहे.
बीड : बंदोबस्त वा गरजेच्या वेळी पोलिसांना मदत म्हणून नियुक्त गृहरक्षक दलाचे जिल्ह्यातील ४०० जवानांची सेवा स्थगित करण्यात आली आहे. होमगार्ड व नागरी संरक्षण विभागाने या संदर्भात जिल्हा समादेशकांना १० जानेवारी रोजी एका पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.
शासनाकडून व्यावसायिक व विशेष सेवा या लेखाशिर्षाखाली निधी उपलब्ध झालेला नसल्याचे कारण या स्थगितीबाबत दिले आहे. या निधीबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यात बंदोबस्तावरील पोलिसांना पूरक सेवा देण्यासाठी ४०० होमगार्ड नियुक्त केले होते. होमगार्ड व नागरी संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक तथा वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर ५० टक्के कायमस्वरुपी बंदोबस्त स्थगित ठेवण्यात आला आहे.
४० लाखांचा निधी प्रस्ताव
बीड जिल्ह्यातील २८ पोलीस ठाणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी ४०० होमगार्ड मनुष्यबळ मागणी व आवश्यकतेनुसार कायमस्वरुपी नियुक्त होते. त्यांची सेवा स्थगित करण्यात आली आहे. महिला व पुरुष होमगार्ड यांना प्रतिदिन ६७० रुपये भत्ता मिळत होता.
आतापर्यंत देण्यासाठी लागणाºया भत्त्याची रक्कम ४० लाखांच्या घरात आहे. त्याबाबत निधी मागणी प्रस्ताव राज्याच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.