जिल्ह्यात १,२२२ शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्षच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:50 AM2021-02-23T04:50:16+5:302021-02-23T04:50:16+5:30
बीड : आरटीईअंतर्गत शाळांच्या सुविधांबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यादृष्टीने शासनाच्या नियमांची परिपूर्णता करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी शाळांचे प्रमुख ...
बीड : आरटीईअंतर्गत शाळांच्या सुविधांबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यादृष्टीने शासनाच्या नियमांची परिपूर्णता करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी शाळांचे प्रमुख म्हणून असलेल्या मुख्याध्यापकांना स्वतंत्र कक्षच नसल्याने ज्या खोलीत ते शिकवतात, त्याच खोलीतून शाळेचे व्यवस्थापन त्यांना चालवावे लागत आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या २,४९१ शाळा आहेत. यात ५६ शाळा माध्यमिक आहेत. पहिली ते चौथीपर्यंत १,८५४ शाळा आहेत. या शाळांमध्ये दोन किंवा चार शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांना स्टाफ रूमची गरज पडत नाही, तर ज्याच्याकडे पदभार आहे, ते शिक्षक ज्या वर्गाला शिकवतात, तोच वर्ग त्यांचे कार्यालय, असे मानून कामकाज होत आहे. त्यामुळे या शाळांमध्ये स्वतंत्र मुख्याध्यापक कक्षाची सुविधा नसल्याचे दिसून आले. जि.प.च्या एकूण २,३६५ पैकी १,१४३ शाळांमध्येच मुख्याध्यापक कक्ष आहे. डीपीईपी कार्यक्रमानुसार दिलेल्या आकृतिबंधात षटकोनी खोल्यांचे नियोजन आहे. त्यात दोन वर्गखोल्या व एक मुख्याध्यापक कक्षाचा समावेश आहे. मात्र, मुळातच बहुतांश ठिकाणी वर्गखोल्याच अपुऱ्या आहेत, तर काही ठिकाणी वर्गखोल्या दुरुस्तीला आल्या आहेत. तेथे मुख्याध्यापक कक्षाचा अभाव अद्यापही आहे. शैक्षणिक सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना शाळेच्या हेड मास्तरांच्या खोलीकडे दुर्लक्ष व्हायला नको, अशा प्रतिक्रिया काही शिक्षकांनी दिल्या.
मुख्याध्यापकाचा स्वतंत्र कक्ष गरजेचा
शाळेत येणारे पालक, तसेच अभ्यागतांना भेटण्यासाठी मुख्याध्यापकांना कक्ष असणे आवश्यक आहे. स्वतंत्र कक्ष परिणामकारक ठरतो. सध्या मात्र ते ज्या वर्गात शिकवतात तोच वर्ग त्यांचे कार्यालय असेच स्वरूप आहे. टेबल, खुर्ची, कपाट, रेकॉर्ड, प्रवेश निर्गम, शैक्षणिक साहित्य तेथे असते. यामुळे अध्यापन करताना अनेक अडथळे येतात.
स्टाफ रूमची गरज भासत नाही
माध्यमिक विभागाच्या सर्व ५६ शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्ष व स्टाफरूम आहेत. मात्र, प्राथमिक विभागाच्या शाळांमध्ये शिक्षक संख्या प्रमाणातच असल्याने, तसेच जागा अपुरी असल्याने, भौतिक सुविधा नसल्याने स्टाफ रूमची आवश्यकता भासत नाही. मात्र, पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांमध्ये वर्गखाेलीच शिक्षकांसाठी शालेय कामकाजाचे स्थळ असते. बहुतांश शाळांमध्ये तासिका नसताना शिक्षकांना मात्र शाळा परिसरात फिरण्याची वेळ येते, तर काही शाळांमध्ये मुख्याध्यापकांचा कक्षच शिक्षकांसाठी स्टाफ रूमसारखा असतो.
----------
विद्यार्थ्यांच्या सुविधांना प्राधान्य
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गखोल्या आधी आवश्यक आहेत. नंतर अन्य सुविधांचा विचार करता येईल. परिपूर्ण सुसज्ज शाळेसाठी मुख्याध्यापक कक्ष, ग्रंथालय, वाचन कट्टा, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष व इतर आवश्यक सुविधांची गरज असते. जिल्ह्यात दोन अथवा चार खोल्या असलेल्या छोट्या शाळा वगळता बहुतांश शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्ष आहेत. मात्र, प्राधान्यक्रम विद्यार्थ्यांच्या सुविधांना आहे.
-श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.), बीड
---------
जिल्ह्यात एकूण सर्व शाळा ३,६३८
मुख्याध्यापक कक्ष असलेल्या शाळा २,३०२
कक्ष नसलेल्या शाळा १,३८४
६३ टक्के शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्ष आहेत. ३७ टक्के शाळांमध्ये कक्ष नाही.
---------
जि.प. शाळा २,३६५
मुख्याध्यापक कक्ष असलेल्या शाळा १,१४३
कक्ष नसलेल्या शाळा १,२२२
४६ टक्के शाळांमध्ये कक्ष आहे. ५४ टक्के शाळांमध्ये कक्ष नाही.
----------