रेल्वे सुरू होऊनही घाटनांदूरला थांबाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:32 AM2021-08-29T04:32:17+5:302021-08-29T04:32:17+5:30
प्रवाशांची गैरसोय : थांबा देण्याची प्रवासी संघटनेची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क घाटनांदूर : कोरोनाच्या काळात दळणवळणासह सर्वच यंत्रणा ठप्प ...
प्रवाशांची गैरसोय : थांबा देण्याची प्रवासी संघटनेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटनांदूर : कोरोनाच्या काळात दळणवळणासह सर्वच यंत्रणा ठप्प होऊन कोलमडली होती. गत २२ मार्चपासून घाटनांदूर रेल्वेस्थानकावरून चालणाऱ्या सर्वच रेल्वे बंद होत्या. मागील काही दिवसांपासून काही रेल्वे सुरू झाल्या आहेत. त्या रेल्वे काऊंटरवर तिकीट विक्री करण्यास परवानगी आहे. मात्र स्थानकावर रेल्वेच थांबत नसल्याने रेल्वे सुरू होऊनही उपयोग काय? असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला आहे.
कोरोनाच्या काळात सर्वच रेल्वे बंद ठेवण्यात आल्या होत्या. मागच्या काही दिवसांपासून रेल्वे सेवाही पटरीवर येत आहे. घाटनांदूर रेल्वेस्थानक अतिशय सोयीचे असून व्यापाऱ्यांना खरेदीसाठी हैदराबाद, औरंगाबाद, आदी ठिकाणी जाण्यासाठी अनेक रेल्वे उपलब्ध होत्या. मात्र गत दोन वर्षांत संपूर्ण व्यवसायाची वाट लागली. आता कुठे रेल्वे सुरू झाल्या आहेत; पण सुरू झालेल्या रेल्वेंना थांबाच नसल्याने प्रवाशांच्या अडचणीत वाढ होत आहे.
घाटनांदूर रेल्वेस्थानकातून हैदराबाद-पूर्णा, पूर्णा-हैदराबाद, बंगलोर-नांदेड, नांदेड -बंगलोर, औरंगाबाद -हैदराबाद, हैदराबाद-औरंगाबाद, मिरज-पंढरपूर, पंढरपूर-मिरज, निजामाबाद -पंढरपूर, पंढरपूर-निजामाबाद, निजामाबाद -पुणे, पुणे -निजामाबाद या रेल्वे बंद आहेत. या व्यतिरिक्त शिर्डी, तिरूपती, मुंबई, आदी रेल्वे धावतात. मात्र बहुसंख्य रेल्वेंना येथे थांबाच नाही. याशिवाय पॅसेंजर रेल्वे असलेल्या पूर्णा-हैदराबाद, हैदराबाद -औरंगाबाद या दोन रेल्वे विशेष एक्सप्रेस म्हणून परावर्तित केल्याने तिकिटांचे अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत._
....
एक्सप्रेसला थांबा नाही
घाटनांदूर येथे सर्वच रेल्वेंना थांबा मिळाल्यास किनगाव, अहमदपू, तर इकडे अंबाजोगाई, केज भागातील प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. कारण केज, अंबाजोगाई येथून परळीला जाण्यापेक्षा घाटनांदूर रेल्वेस्थानक सोयीचे आहे. तोच प्रकार धर्मापुरी, किनगाव, अहमदपूर प्रवाशांच्या बाबतीत आहे. त्यामुळे घाटनांदूर रेल्वेस्थानकावर पूर्वी थांबत असलेल्या रेल्वेचे थांबे कायम ठेवून एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना थांबे देणे गरजेचे आहे.
....
आरक्षणाची व्यवस्था नाही
गत दहा वर्षांपासून येथे आरक्षण काऊंटर उघडण्याची मागणी प्रलंबित आहे. रेल्वे विभागाला शेकडो वेळा निवेदने दिली; पण आरक्षण काउंटरबाबत निर्णय घेतला गेला नाही. येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पूर्वी थांबा असलेल्या पूर्णा-हैदराबाद, औरंगाबाद-हैदराबाद, नांदेड -बंगलोर या गाड्यांचा थांबा कायम ठेवून घाटनांदूर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रा. सुरेश जाधव यांनी केली आहे.
280821\img-20191207-wa0041.jpg
घाटानांदूर रेल्वे