रेमडेसिवीर आहे का? देता का, कोणी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:35 AM2021-04-07T04:35:02+5:302021-04-07T04:35:02+5:30
बीड : कोरोना संसर्गाचा उद्रेक होत असून, सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ...
बीड : कोरोना संसर्गाचा उद्रेक होत असून, सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या इलाजासाठी सध्यातरी रामबाण असलेल्या रेमडेसिवीरसाठी शहरातील औषधी दुकानांकडे विचारणा होत असून, रेमडेसिवीर नसल्याचे उत्तर मिळत असल्याने रुग्णांचे नातेवाईक या नाही तर त्या दुकानांवर शोध घेत पायपीट करीत आहेत.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये तसेच खासगी कोविड रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितरुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयांत रेमडेसिवीर उपलब्ध आहे. परंतु खासगी रुग्णालयांकडून स्थानिक पातळीवर (लोकल परचेस) रेमडेसिवीर खरेदी करून आणा, असे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जात असल्याने ते भर उन्हात शहरभर फिरत आहेत. खासगी कोविड रुग्णालयांना अटॅच असलेल्या औषधी दुकानांना रेमडेसिवीर विक्रीची अनुमती आहे. मात्र, मोठे पॅकेज देणाऱ्या रुग्णांची सोय करताना सामान्य रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत. बीडमधील काही औषधी विक्रेत्यांशी चर्चा केली असता, रेमडेसिवीरसाठी बीडमधील विविध रुग्णालयांतील रुग्णांचे नातेवाईक मागील काही दिवसांपासून विचारणा करतात. दिवसभरात किमान पंधरा ते वीस जण चौकशी करतात, असे सांगण्यात आले. तसेच पुणे, औरंगाबाद व बाहेरगावाहूनही रेमडेसिवीर उपलब्धतेबाबत विचारणा होत असल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले. ज्या रुग्णालयात रुग्ण दाखल आहेत, तेथे उपचारासाठी आवश्यक रेमडेसिवीर शासनाने निर्धारित केलेल्या दरात उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना खासगी रुग्णालयांकडून नातेवाईकांची फरपट चालविली जात आहे. शहरात फिरून रिकाम्या हाती परतलेल्या नातेवाईकांना काही दलालांच्यामार्फत रेमडेसिवीर जादा दराने उपलब्ध करून दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
औषध विक्रेत्यांकडून काळाबाजार होण्याचा प्रश्नच नाही. कारण, त्याची कायदेशीर परिपूर्ण नोंद असते. ठोक खरेदी करून मिळणाऱ्या किमतीपेक्षाही योग्य दरात विकण्याची आमची तयारी आहे. कारण, पेशंटला वेळीच औषध मिळणे महत्त्वाचे आहे. मात्र औषध विक्रेत्यांना परवानगी नाही, अशी खंत एका विक्रेत्याने बोलून दाखवली.
-------
तपासणीची गरज
ड्रग अलोकेशन उपलब्ध असते. त्यानुसार किती रेमडेसिवीर आले? किती रुग्णांना किती वापर झाले, त्यांना योग्य दरात मिळाले का? हे तपासण्याची गरज आहे. औषध प्रशासन या कामाला लागल्याचे समजते.
----
पोलिसांकडेही तक्रारी
रेमडेसिवीर इंजेक्शनचा अवैधरीत्या साठा केलाया जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार चाैकशी सुरू असून, आवश्यक वस्तू कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पोलीस प्रशासन साठेबाजांवर कारवाया करणार आहे.
- सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक,बीड.
---
चार हजार रेमडेसिवीरचा साठा शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे. पुणे, नगर येथे डेपोतही तुटवडा आहे. महाराष्ट्रातून अन्य राज्यात पुरवठा होत असल्याने तुटवडा जाणवतो आहे. सध्या जेमतेम साठा असला तरी तीन हजार रेमडेसिवीरची मागणी करण्यात आली आहे. दोन-चार दिवसांत सुरळीतपणा येईल. तसेच तपासण्याही सुरू केल्या आहेत.
- रामेश्वर डोईफोडे, औषध निरीक्षक, बीड.
----------